नवी दिल्ली : करोना विषाणूच्या जागतिक आक्रमणामुळे टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलणेच योग्य ठरेल, असे मत भारताचे मुख्य बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. मात्र जगातील आठ हजार नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आह्रे तर दोन लाखांहून अधिक जणांना त्याची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याविषयी चर्चा सुरू आहे. ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल, असे बुधवारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केले.

”ऑलिम्पिक स्पर्धेबाबत माझ्या मनात शंका आहेत.  आतापर्यंत तयारीला सुरुवात व्हायला हवी होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या संदर्भात निर्णय घेतला असता तर आमच्यावरील दडपण कमी झाले असते,” असे गोपीचंद यांनी सांगितले.

”सध्या जगातील सर्वच देश आपल्या नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा यांचा गांभीर्याने विचार करीत आहेत. सद्य:स्थितीत आरोग्याचा धोका आणि प्रवासाचे निर्बंध ही आव्हाने असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलणे योग्य ठरू शकेल,” असे गोपीचंद म्हणाले.

करोनाचा वेगाने प्रसार होत असतानाही ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या जागतिक बॅडमिंटन महासंघावर मोठय़ा प्रमाणात टीका झाली होती. आर्थिक फायद्यासाठी खेळाडूंच्या सुरक्षेशी तडजोड करू नये, अशा शब्दांत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने टीका केली होती. ”खेळाडूंचे आरोग्य धोक्यात घालून ऑल इंग्लंड स्पर्धेचे आयोजन करण्याचा जागतिक बॅडमिंटन महासंघाचा निर्णय चुकीचा होता,” असे गोपीचंद यांनी सांगितले. बर्मिगहॅमहून या स्पर्धेनंतर मायदेशी परतल्यानंतर ते आता विलगीकरण कक्षात आहेत.

धोका असतानाही भारत सहभागी होईल ; भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अधिकाऱ्याचे मत

सध्या टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन अशक्य वाटत असले तरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) पूर्वनियोजित वेळेनुसार आयोजनाबाबत ठाम आहे. याला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननेही (आयओए) पाठिंबा दर्शवला आहे. ऑलिम्पिकचे आयोजन झाल्यास, धोका असतानाही त्यात भारतीय खेळाडूंचा सहभाग असेल, असे मत भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

‘‘करोना विषाणूने जगभर हाहाकार माजवला असला तरी एक-दोन महिन्यांत त्यावर नियंत्रण मिळवता येईल. या विषाणूचे केंद्र असलेल्या चीनने करोनावर नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळेच टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन बिनदिक्कतपणे होईल, अशी आशा आहे. ‘आयओसी’ ही आमची पालक संघटना आहे. त्यामुळे त्यांनी ऑलिम्पिकचे आयोजन करण्याचे ठरवले तर आम्हाला धोक्याला न जुमानता सहभागी व्हावेच लागेल,’’ असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.