जपानच्या खेळाडूंनी चार गटांत विजेतेपद मिळवत सुशांत चिपलकट्टी स्मृती कनिष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत वर्चस्व गाजवले. मुलांच्या १९ वर्षांखालील गटात थायलंडच्या पाचारापोल निपोर्नरामला विजेतेपद मिळाले.

मॉडर्न क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत भारताच्या वृषाली गुम्माडीच्या कामगिरीबाबत उत्सुकता होती. मात्र जपानच्या अग्रमानांकित नात्सुकी निदेराने तिला ११-६, १२-१०, ९-११, ११-८ असे हरवले. मुलांच्या एकेरीत अव्वल मानांकित निपोर्नरामने झिन रेई रियानिग (सिंगापूर) या द्वितीय मानांकित खेळाडूला ११-९, १४-१५, ११-९, ८-११, ११-४ असे पराभूत केले. मुलांच्या दुहेरीत हिरोकी ओकामुरा व मासायुकी ओनोडेरा यांनी अजिंक्यपद पटकावले. हिरोकीने नामी मात्सुयामाच्या साथीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवत दुहेरी यश संपादन केले. मात्सुयामाने सायाका होबाराच्या साथीने मुलींच्या दुहेरीच्या विजेतेपदावर मोहोर उमटवली.

वृषालीने नात्सुकीविरुद्ध दुसरा गेम जिंकत सामन्यात उत्कंठा निर्माण केली होती. मात्र नंतरचे दोन्ही गेम्स तिला थोडक्यात गमवावे लागले आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पुल्लेला गोपीचंद यांच्या अकादमीत शिकणाऱ्या वृषालीने सामन्यातील कामगिरीबाबत सांगितले, ११ गुणांची गेम लवकर संपते. त्यामध्ये प्रत्येक गुणासाठी संघर्ष जास्त करावा लागतो. तिसऱ्या व चौथ्या गेममध्ये मी दिलेले नकारात्मक गुण मला खूप महागात पडले. अर्थात उपविजेतेपदाबद्दलही मला आनंद वाटतो. कारण येथील प्रतिस्पर्धी तुल्यबळ होते.

भारताच्या कृष्णाप्रसाद गरग व ध्रुव कपिल यांना मुलांच्या दुहेरीत ओकामुरा व ओनोडेरा यांनी ११-५, १२-१४, ११-९, १३-११ असे पराभूत केले. दुसरी गेम घेत कृष्णप्रसाद व ध्रुव यांनी सामन्यात रंगत निर्माण केली होती. तिसऱ्या व चौथ्या गेममध्ये त्यांना प्लेसिंगवर नियंत्रण ठेवता आले नाही. हिरोकी व मात्सुयामा यांनी मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत मलेशियाच्या तांग जिईचेन व जिया जिया तेव्ह यांचा ८-११, ८-११, ११-६, १३-११, ११-४ असा पराभव केला.

मुलींच्या दुहेरीत मात्सुयामा व सायाका यांनी जिया जिया तेव्ह व येई याप यांचा ११-२, ११-८, ११-५ असा धुव्वा उडवला.