ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट इथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत महिला बॅडमिंटनच्या एकेरी स्पर्धेत भारतालाच सुवर्णपदक मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. अंतिम फेरीची सामना सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांच्यात रंगणार आहे. उपांत्य फेरीमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवत भारताच्या सायना व सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

सायनानं उपांत्य फेरीत स्कृॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरला नमवलं तर सिंधूनं कॅनडाच्या मिशेलला पराभवाची धूळ चाखत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे बँडमिंटनच्या महिला एकेरीमध्ये भारताची सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई निश्चित झाली आहे. २०१० मध्ये दिल्लीमध्ये सायनानं सुवर्णपदक जिंकले होते, परंतु नंतर ग्लास्गोमध्ये चार वर्षांनी दुखापतीमुळे ती खेळू शकली नव्हती. भारताच्या या अत्यंत प्रसिद्ध आणि प्रचंड लोकप्रिय असलेल्या दोन्ही फुलराण्यांमध्ये कॉमनवेल्थमध्ये अंतिम सामन्यात लढत होणार असल्यामुळे या सामन्याला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे.

दरम्यान किदंबी श्रीकांतनेही आपली छाप या स्पर्धेत सोडली आहे. त्यानेही अंतिम फेरीत प्रवेश केला असून त्याची गाठ मलेशियाच्या ली चोंग वेईशी पडणार आहे. पुरूष एकेरीमध्येही श्रीकांत सुवर्ण मिळवेल अशी अपेक्षा आहे. तर मिश्र दुहेरी स्पर्धेमध्ये कास्य पदकासाठी अश्विनी पोनप्पा व एन सिक्की रेड्डी यांचा मुकाबला ऑस्ट्रेलियाच्या सेतिना मपासा व ग्रोना सॉमरविले यांच्याशी होणार आहे.