आज थायलंडविरुद्ध उपांत्यपूर्व सामना

मनिला (फिलिपिन्स) : दुहेरी विशेषज्ञ सात्त्विकसाईराजच्या अनुपस्थितीचा भारताला फटका बसला. त्यामुळे आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेच्या ब-गटात भारताने युवा मलेशिया संघाकडून १-४ अशी हार पत्करली.

पायाच्या घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे सात्त्विकला भारतीय संघातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे भारताला एमआर अर्जुन आणि चिराग शेट्टी तसेच ध्रुव कपिला आणि लक्ष्य सेन अशा जोडय़ा खेळवाव्या लागल्या. या जोडय़ांनी आपले सामने गमावले.

रिझाल क्रीडा संकुलात झालेल्या या लढतीत फक्त किदम्बी श्रीकांतला विजय नोंदवता आला. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावर असलेला बी. साईप्रणीत आणि एचएस प्रणॉय या दोघांनीही एकेरीच्या सामन्यांत सहज हार पत्करली. या पराभवानंतर भारताला ब-गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे शुक्रवारी भारताचा उपांत्यपूर्व सामना थायलंडशी होणार आहे.

सलामीच्या सामन्यात कझाकस्तानविरुद्ध ४-१ असा दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारताचा मलेशियाविरुद्ध निभाव लागला नाही. सात्त्विकच्या अनुपस्थितीत भारताला दमदार सुरुवात करून देण्याची जबाबदारी साईप्रणीतवर होती. परंतु जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानावर असलेल्या ली झि जियाने साईप्रणीतला २१-१८, २१-१५ असे नामोहरम केले. मग चिराग-अर्जुन जोडीने ३१ मिनिटांत पराभव पत्करला. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या आरोन चिआ आणि सोह वूई यिक जोडीने त्यांचा २१-१८, २१-१५ असा पराभव केला.

श्रीकांतने २३ वर्षीय चीम जून वेईविरुद्ध १४-२१, २१-१६, २१-१९ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. त्यानंतर ध्रुव-लक्ष्य जोडीने ओंग येव सिन आणि तिओ ई यि जोडीकडून १४-२१, १४-२१ असा पराभव पत्करला. तिसऱ्या एकेरीत प्रणॉयचा लीआँग जून हाओविरुद्ध निभाव लागला नाही. लीआँगने ३४ मिनिटांत २१-०, २१-१५ असा विजय मिळवला.