भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद आपल्याकडेच राखण्याचे स्वप्न शनिवारी संपुष्टात आले. थायलंडच्या पोर्नपावी चोचूवाँग हिने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत सिंधूचा सहज फडशा पाडला. सिंधूच्या पराभवामुळे भारताचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला चोचूवाँगचा वेग, उर्जा आणि खेळातील सातत्य याच्याशी बरोबरी साधता आली नाही. त्यामुळे जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या युवा चोचूवाँगने सिंधूला ४३ मिनिटांतच २१-१७, २१-९ असे सहज पराभूत केले. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सिंधूला २०१८मध्येही उपांत्य फेरीतच हार पत्करावी लागली होती.

सिंधूने आक्रमक खेळ करत ३-१ अशी आश्वासक सुरुवात केली. पण चोचूवाँगच्या फटक्यांचा अंदाज न आल्याने सिंधू पिछाडीवर पडत गेली. चोचूवाँगचे काही फटके नेटवर गेल्याने सिंधूला गुण मिळत गेले. अखेर चोचूवाँगने २१-१७ अशा फरकाने पहिला गेम जिंकत सामन्यात आघाडी घेतली. पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्येही सिंधूला खेळ उंचावता आला नाही. चोचूवाँगच्या वेगवान खेळापुढे ती निष्प्रभ ठरली.