बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल मानांकित खेळाडू ली चोंग वेई याच्यावर उत्तेजक द्रव्य सेवनाबद्दल आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने आठ महिन्यांकरिता बंदी घातली आहे. बंदीचा कालावधी गेल्या ऑगस्टपासून ठरविण्यात आल्यामुळे ली चोंग हा पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळू शकणार आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये कोपनहेगन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या वेळी घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत ली चोंग हा दोषी आढळला होता. मलेशियाचा ३३ वर्षीय खेळाडू ली चोंग याच्यावर गतवर्षी ११ नोव्हेंबर रोजी तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. ली चोंग याच्या आहारातील एका पदार्थात डेक्झमीथासोन हे बंदी घातलेले द्रव्य आढळले होते. महासंघाने ११ एप्रिल रोजी घेतलेल्या चौकशी समितीपुढे चोंग याने आपण उत्तेजक घेतल्याची कबुली दिली होती. त्याने हे द्रव्य नकळत घेतले असल्याचा युक्तिवाद चोंग याच्या वकिलाने केला व त्याला कमीत कमी शिक्षा करावी अशी विनंती केली. हा युक्तिवाद मान्य करीत महासंघाच्या चौकशी समितीने चोंग याने कोणालाही फसविण्यासाठी हे उत्तेजक घेतले नव्हते. नजरचुकीने त्याने हे द्रव्य घेतले असल्याचे चौकशी समितीने मान्य करीत चोंग याला सौम्य शिक्षा दिली.