भारताची सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू व किदम्बी श्रीकांत यांना मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल यश मिळविण्यासाठी कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे.  
सिरी फोर्ट क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना परदेशातील बलाढय़ खेळाडूंशी दोन हात करावे लागतील. सायनाला आठवे मानांकन मिळाले असून तिला पहिल्या फेरीत ऑस्ट्रियाच्या सिमोन प्रुश हिच्याशी खेळावे लागणार आहे. ऑलिम्पिक विजेती लिऊ झुरेईला अव्वल मानांकन मिळाले होते, मात्र तिने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. तिच्या अनुपस्थितीत सायनाला वर्चस्व गाजवण्याची हुकमी संधी आहे.
पुरुष गटात थायलंड विजेता किदम्बी श्रीकांत, ऑलिम्पिकपटू पारुपल्ली कश्यप, सौरभ वर्मा, आरएमव्ही गुरुसाईदत्त, बी. साईप्रणित, आनंद पवार, एच. एस. प्रणय हे खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. कश्यप याला सहाव्या मानांकित झेंगमिंग वाँग याच्याशी खेळावे लागणार आहे. वर्मा याला रशियाच्या व्लादिमीर इव्हानोव्ह याच्याशी झुंज द्यावी लागेल. साईप्रणितपुढे चीनच्या पेंगयु दुओ याचे आव्हान असेल. पवार याला चौथ्या मानांकित जॉन जॉर्गेन्सन याच्याशी खेळावे लागेल.