भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप या वर्षाखेरीस विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून जगापासून लपून प्रेमात अखंड बुडलेल्या या जोडप्याने अखेर लग्नाचा मुहूर्त ठरवला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप १६ डिसेंबर २०१८ रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. कौटंबिक आणि मोजक्याच जवळील व्यक्तींच्या उपस्थितीत हा विवहसोहळा पार पडणार आहे. त्यामध्ये फक्त १०० लोकांचा सहभाग असेल. लग्नानंतर पाच दिवसांनी २१ डिसेंबर रोजी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी मित्र-मंडळी, क्रीडा आणि चित्रपट जगातातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दोन्ही कुटुंबियांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे.

ऑलिम्पिकमधील कांस्यपदकविजेती सायना आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक पारुपल्ली कश्यप यांच्यातील नात्याची खूप दिवसांपासून चर्चा होती. प्रशिक्षक गोपीचंद यांचे दोघेही शिष्य. त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप वर्षांपासून मैत्री आहे. या नात्याचे रुपांतर आता विवाहबंधनात होत आहे. विशेष बाब म्हणजे सायना आणि कश्यपचे प्रशिक्षक असलेल्या पुलैला गोपिचंद यांची प्रेमकहाणीसुद्धा अशीच चर्चेचा विषय ठरली होती.

दीपिका पल्लीकल-दिनेश कार्तिक, इशांत शर्मा-प्रतिमा सिंह, गीता फोगाट-पवन फोगाट आणि साक्षी मलिक-सत्यवर्त काडयान या खेळाडूच्या यादीत आता सायना-कश्यप यांचे नाव जोडले जाईल.