अल्मेरे (नेदरलँड्स) : डच खुली सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात होणार असून सौरभ आणि समीर या वर्मा बंधूंवर भारताची प्रमुख भिस्त असणार आहे.

अव्वल मानांकित समीर सध्या तंदुरुस्तीच्या समस्यांना तोंड देत असून त्याने चीन आणि कोरिया येथील स्पर्धामधून माघार घेतली होती. सौरभने गेल्या महिन्यात व्हिएतनाम खुल्या सुपर १०० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या जागतिक टूर फायनल्स या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत समीरने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. त्यानंतर त्याचा कठीण काळ सुरू झाला असून समीरला या वर्षी सिंगापूर खुली आणि आशिया अजिंक्यपद स्पर्धेतच उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले होते. अनेक स्पर्धामध्ये तो पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीतच गारद झाला आहे. समीरने गेल्या वर्षी तीन स्पर्धा जिंकल्या होत्या, त्यामुळे त्याला क्रमवारीत १०व्या स्थानी झेप घेता आली होती. त्याला या स्पर्धेत पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे.

चौथ्या मानांकित सौरभने या वर्षी हैदराबाद आणि व्हिएतनाम खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यालाही पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली असून दुसऱ्या फेरीत त्याचा सामना स्पेनच्या पाबलो अबियान याच्याशी होण्याची शक्यता आहे.

युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन हासुद्धा या स्पर्धेत उतरणार असून त्याला पहिल्या फेरीत आर्यलडच्या नॅट गुयेन याच्याशी लढत द्यावी लागेल. महिला एकेरीत, माजी राष्ट्रीय विजेती रितूपर्णा दास हिचा सामना इस्रायलच्या सेनिया पोलिकार्पोव्हा हिच्याशी होईल. महिला दुहेरीत पूजा दांडू आणि संजना संतोष यांना आठव्या मानांकित एम्मा कार्लसन आणि योहाना मॅग्नूसन यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.