अजय जयराम व पारुपल्ली कश्यप यांनी विजयी वाटचाल सुरू केल्यानंतर विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल व पी.व्ही.सिंधू यांच्या कामगिरीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
महिलांच्या एकेरीत सायना व सिंधू या दोन्ही खेळाडूंना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. दुसऱ्या फेरीत सायनाला रशियाच्या ओल्गा गोबोव्हानोवा हिच्याबरोबर खेळावे लागणार आहे. ओल्गाने पहिल्या फेरीत बेलारुसच्या अ‍ॅलिसिया झैत्सवा हिचा २१-१३, २१-१४ असा पराभव केला होता. सायनाने गतवर्षी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याने या स्पर्धेत तिच्याकडून पदकाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तिला या स्पर्धेत तिसरे मानांकन मिळाले आहे, तर सिंधूला दहावे मानांकन देण्यात आले आहे. दुसऱ्या फेरीत तिच्यापुढे जपानची खेळाडू काओरी इनावेत्सु हिचे आव्हान असेल. काओरीने पहिल्या फेरीत अ‍ॅप्रिएला मुस्वान्दरी हिच्यावर २१-१८, २१-१० अशी मात केली होती.
जयराम व कश्यप यांनी पुरुषांच्या एकेरीतील पहिल्या फेरीत शानदार विजय मिळविला असून त्यांच्या कामगिरीबाबत उत्कंठा वाढली आहे. जयरामने पहिल्या फेरीत बाराव्या मानांकित विंग कीवोंगवर सनसनाटी विजय मिळविला होता. त्याला आता स्पेनच्या पाब्लो अ‍ॅबियन याच्याशी खेळावे लागणार आहे. पाब्लोने पहिल्या फेरीत ओस्लेनी गुएदेरो या क्युबाच्या खेळाडूचा २१-१४, २३-२१ असा पराभव केला होता. कश्यप याच्यापुढे चेक प्रजासत्ताकचा खेळाडू पेत्र कौकाल याचे आव्हान असणार आहे. पेत्र याने पहिल्या फेरीत एरिक मेजीस (नेदरलँड्स) याला २१-१८, १०-२१, २१-१४ असे हरविले होते.
पुरुष दुहेरीत तरुण कोना व अरुण विष्णु हे नशीबवान ठरले आहेत. पहिल्या फेरीत त्यांना अ‍ॅडम क्रॅलिना व प्रिजेस्लॉव्ह वॉचो (पोलंड) यांच्याकडून पुढे चाल मिळाली. त्यांना दुसऱ्या फेरीत अल्वेन्ट युलियांतो व मार्किस किडो (इंडोनेशिया) यांच्याशी खेळावे लागणार आहे.