कोणताही खेळ आता केवळ खेळ म्हणून कसा आहे यापेक्षा त्यात ‘करमणूक मूल्य’ कितपत आहे, ते बघून तो विकला जातो. गेल्या दीड-दोन दशकांपासून जगभरामध्ये लोकप्रियतेत सातत्याने वाढ होत असलेला बॅडमिंटनदेखील त्याला अपवाद नाही. जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) तांत्रिक समितीने बॅडमिंटनच्या खेळात ‘वेग’ येण्याचे कारण पुढे करत प्रत्येक गेम हा २१ ऐवजी ११ गुणांचा करण्याचा प्रस्ताव संघटनेच्या सदस्यांपुढे ठेवला होता. मात्र तो मंजूर न झाल्याने विद्यमान गुणपद्धतीच कायम राहणार आहे. जर हा बदल झाला असता तर बॅडमिंटनमधील ‘रॅली’ आणि खेळाडूंचे कौशल्य पाहायला मिळणे दुरापास्त होऊन केवळ ‘स्मॅश’चा भडिमार असलेला ताकदीचा खेळ म्हणूनच तो उरला असता. हा अव‘गुणी’ डाव उधळला गेल्याने खेळाचे सौंदर्य कायम राहणार असल्याचे समाधान खऱ्या बॅडमिंटनप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

हा नियम बदलाचा प्रस्ताव ठेवण्यामागे तांत्रिक समितीने खेळाचा वेग वाढवणे हे दाखवण्याचे कारण होते. मात्र प्रत्यक्षात तो करमणुकीच्या दृष्टीने म्हणजेच त्याच्या प्रदर्शनादरम्यान अधेमधे जाहिराती घुसवता येण्याच्या दृष्टीने सोयीस्कर करण्याचा तो ‘डाव’ होता; परंतु सुदैवाने अद्याप तरी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन संघटनेमध्ये खेळाविषयी आस्था असणारे संघटक सदस्य असल्याने तो डाव हाणून पाडण्यात आला. तसेच आशियाई खेळाडूंच्या तुलनेत युरोप खंडातील खेळाडूंमध्ये ताकद अधिक असल्याने त्यांना या प्रस्तावित नियमाचा लाभ अधिक प्रमाणात मिळावा, असादेखील कावा या तांत्रिक समितीचा असू शकत होता. त्यावरील निर्णयाखातर जागतिक बॅडिमटन महासंघाच्या एकूण २५२ सदस्यांनी या गुणदान पद्धतीत मतदान केले. त्यातील १२९ सदस्यांनी ११ गुणांच्या बाजूने मतदान केले, तर १२३ सदस्यांनी त्याविरोधात म्हणजेच २१ गुणांचा गेम कायम राखण्याच्या बाजूने मतदान केले. निम्म्यापेक्षा अधिक सदस्यांनी ११ गुणांच्या बाजूने मतदान केल्याने तो निर्णय मंजूरदेखील झाला असता. मात्र संघटनेच्याच नियमांनुसार नियमांमध्ये कोणताही मोठा बदल करायचा असल्यास त्यासाठी दोन-तृतीयांश मते आवश्यक असतात; परंतु ११ गुणांचा नियम करण्यासाठी जवळपास ४० मते कमी पडली. त्यामुळेच २१ गुणांचा नियम कायम राहिला असून भारतीय खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या मतेदेखील हीच गुण पद्धती अधिक योग्य आहे.

विद्यमान पद्धतीची दहा वर्षे

२००६-०७ सालापासून २१ गुणांच्या गेमची पद्धती स्वीकारण्यात आली असून खेळाडूंचे कौशल्य, तंदुरुस्ती आणि खेळाचे सौंदर्य कायम राखण्यास उपयुक्त ठरली आहे. २१ गुणांच्या गेममध्ये प्रारंभी ५-७ गुणांनी पिछाडीवर पडलेला खेळाडूदेखील ती भरून काढू शकत असल्याने खेळातील रंजकतादेखील कायम राहते. त्याउलट ११ गुणांचा गेम केल्यास प्रारंभीच्या टप्प्यात काहीसा मागे पडलेल्या खेळाडूला ती पिछाडी भरून काढणे अशक्य बनते.

गुणपद्धतींमधील बदल

  • बॅडमिंटनच्या अगदी प्रारंभीच्या म्हणजे १८७३ सालापासून जवळपास १३० वर्षांच्या काळात १५ गुणांचा एक गेम आणि ३ गेमचा सामना असा नियम पुरुषांसाठी होता, तर महिलांसाठी ११ गुणांचा एक गेम आणि ५ गेमचा सामना असा निकष होता.
  • २००२ साली ७ गुणांचा एक गेम याप्रमाणे ५ गेम असा बदल करण्यात आला.
  • २००६ साली २१ गुणांचा एक गेम याप्रमाणे ३ गेम असा बदल करण्यात आला.
  • २०१४ साली वर्षभरातील काही प्रमुख स्पर्धासाठी ११ गुणांप्रमाणे ५ गेम हा निकष पुन्हा प्रायोगिक तत्त्वावर आणण्यात आला.
  • २०१४ सालीच पुन्हा २१ गुणांचा गेम याप्रमाणे ३ गेमच्या निकषावर पुन्हा शिक्कामोर्तब करण्यात आले.

आशियाई संघटनेच्या माध्यमातून ११ गुणांचा गेम करण्याच्या प्रक्रियेत काही काळ मीदेखील सहभागी होतो. मात्र त्यात खेळाडू स्थिरावण्याच्या आतच गेम संपून जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रेक्षकांच्या दृष्टीनेदेखील २१ गुणांचा सध्याचा नियमच योग्य आहे, असे मला वाटते.

श्रीकांत वाड, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक

खेळ अधिकाधिक लोकप्रिय होण्यासह त्यात जाहिरातींनादेखील वेळ मिळणे ही काळाची गरज बनले आहे. २१ गुणांचे सामने पूर्वी ३० ते ४० मिनिटांत संपत होते. मात्र दोन्ही मातब्बर खेळाडू असल्यास ते सामने  लांबत चालले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर १५ गुणांचे ३ सामने किंवा २१ गुणांचे २ आणि आवश्यकता भासल्यास अखेरचा गेम १५ गुणांचा करण्याबाबत विचार व्हायला हरकत नाही, असे माझे मत आहे.

प्रदीप गंधे,

महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष

हा खेळ जर ११ गुणांचा झाला असता तर त्यातील कौशल्य आणि सौंदर्य हरवले असते. खेळाडूंनी केवळ हल्ले आणि प्रतिहल्ले करत स्मॅशेसचा अतिरेकी वापर झाला असता. त्यामुळे टीव्हीसाठी आणि त्यातील जाहिरातींसाठी कमी गुणांचा अधिक गेम हा प्रकार चांगला वाटत असला तरी खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठीदेखील ते चांगले झाले नसते.

उदय पवार, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक