एकापेक्षा एक दिग्गज फलंदाजांचा समावेश असला तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला यंदाच्या आयपीएलमध्ये अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळेच बंगळुरूवरील विजयासह मोलाचे गुण मिळवून आयपीएल गुणतालिकेत दुसरे स्थान गाठण्याचा निर्धार दोन वेळा विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सने केला आहे.

सात सामन्यांपैकी चार विजय आणि तीन पराभव अशी कामगिरी करणारा कोलकाताचा संघ सध्या ८ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर बंगळुरूच्या संघाने सहा सामन्यांत फक्त दोन विजयांसह ४ गुण मिळवले आहेत आणि ते सातव्या स्थानावर आहेत. कोलकाता आणि बंगळुरूच्या संघांनी मागील लढतीत अनुक्रमे दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करले आहेत. त्यामुळे यातून सावरण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. कोलकाताने दिल्लीकडून २७ धावांनी हार पत्करली. १८७ धावांचे आव्हान पेलताना कोलकाताचा संघ १८.३ षटकांत १५९ धावांत गारद झाला.

सोमवारची लढत ज्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे, ते कोलकातासाठी यशस्वी मैदान मानले जाते. याच ठिकाणी कोलकाताने किंग्ज ईलेव्हन पंजाबला हरवून दुसऱ्यांदा आयपीएल जेतेपदाला गवसणी घातली होती. कोलकाताचा संघनायक गौतम गंभीर फॉर्मात आहे. सात सामन्यांत त्याने तीन अर्धशतके झळकावली आहे. रॉबिन उथप्पा, सूर्यकुमार यादव, युसूफ पठाण आणि आंद्रे रसेल यांच्या फलंदाजीची त्याला सुरेख साथ मिळत आहे. शनिवारच्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही उथप्पाने ५२ चेंडूंत ७२ धावांची खेळी साकारली होती. सुनील नरिन, उमेश यादव आणि पीयूष चावला यांच्यासारख्या गोलंदाजांमुळे कोलकाताची गोलंदाजीसुद्धा मजबूत असली तरी स्फोटक फलंदाजांचा समावेश असलेल्या बंगळुरूपुढे त्यांची अग्निपरीक्षाच ठरणार आहे.

बंगळुरूच्या संघाची मदार फलंदाजीवरच आहे. कर्णधार विराट कोहली, ए बी डी’व्हिलियर्स, के. एल. राहुल व शेन वॉटसन धावफलकावर आव्हानात्मक धावसंख्या लावतील, हीच त्यांची अपेक्षा आहे. ख्रिस गेल पितृत्वाच्या रजेवरून परतला असल्यामुळे बंगळुरूची फलंदाजीची ताकद आणखी वाढली आहे. मात्र फलंदाजांच्या कर्तृत्वाला गोलंदाजीची साथ मिळाली नाही, तर विजय अशक्य आहे, याची कोहलीला पूर्ण कल्पना आहे. शनिवारी हैदराबादविरुद्ध बंगळुरूने १५ धावांनी पराभव पत्करला. वॉटसन फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजीमध्येही फॉर्मात आहे. मात्र युझवेंद्र चहल, केन रिचर्ड्सन, इक्बाल अब्दुल्ला आणि वरुण आरोन यांना अद्याप चमकदार कामगिरी दाखवता आलेली नाही.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.
  • थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स/एचडी, सोनी सिक्स/एचडी.