प्रतिष्ठेच्या उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या भारतीय महिला संघाला ४० लाख रुपयांच्या बक्षिसाने गौरवण्यात येणार आहे. भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष डॉ. अखिलेश दासगुप्ता यांनी यासंदर्भात घोषणा केली. भारतीय संघाच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना १० लाख रुपयांच्या बक्षिसाने सन्मानित करण्यात येणार आहे.
भारतीय महिला संघाने इतिहास घडवला आहे. त्यांच्या कामगिरीला प्रोत्साहन देणे हे कर्तव्य आहे. त्यांच्या या यशाने अन्य खेळाडूंना प्रेरणा मिळेल. महिला संघाने शानदार प्रदर्शनासह खेळ करत समस्त देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरीसाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा खेळाडूंना पुरवण्याचा आमचा प्रयत्न असतो. बक्षीसरूपी गौरव हा याच प्रयत्नांचा एक भाग असल्याचे दासगुप्ता यांनी सांगितले. भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू आणि ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीला प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या बक्षिसाने गौरवण्यात येणार आहे, तर अन्य रक्कम संघाचे अन्य खेळाडू आणि सहयोगी प्रशिक्षक यांना मिळून देण्यात येणार आहे.