संपुष्टात आणायचा असल्यास, भारतात बेटिंगला कायदेशीर मान्यता द्या, अशी मागणी इंग्लंडचे माजी कर्णधार जेफ्री बॉयकॉट, भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायच्युंग भूतिया आणि फिक्कीने केली आहे. ‘‘क्रिकेटमध्ये सट्टेबाजी लावणे अधिकृत केल्यास, भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल. तसेच वाईट प्रवृत्तीच्या लोकांना त्यापासून दूर राखता येईल. घोडेबाजारात सट्टा लावणे अधिकृत असताना, भारतीय सरकारने क्रिकेटमध्येही बेटिंग लावण्यास अधिकृत परवानगी द्यावी,’’ असे बॉयकॉट यांनी सांगितले.
भूतिया म्हणाला, ‘‘युरोपमध्ये बेटिंग हे अधिकृत आहे. त्यामुळेच युरोपियन फुटबॉलमध्ये सामनानिश्चिती झाल्याचे प्रकार फारच कमी वेळा बाहेर आले आहेत. त्यामुळे भारतात सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देण्यात यावी, हाच उत्तम पर्याय ठरू शकेल. खेळाडू लोभी असणे, हे दुर्दैव आहे. काही नासलेल्या क्रिकेटपटूंमुळे खेळ खराब आहे, असे होत नाही. कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नसतो.’’
‘‘अनेक खेळाडूंवर बंदी आणली असली तरी सामनानिश्चितीसारखे प्रकार अद्यापही घडत आहेत. त्यामुळे सरकारने सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता देण्याचा विचार करावा. बेटिंगसारख्या काळ्या बाजारात कोटय़वधी रुपयांचा सट्टा दरवर्षी लावला जातो. याच माध्यमातून देशाला कित्येक दशलक्ष डॉलर महसुलाच्या रूपाने मिळू शकतो,’’ असे फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज अर्थात फिक्कीने म्हटले आहे.