भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावत कमाल केली आहे. या वर्षात पाच पदके जिंकणाऱ्या २४ वर्षीय बजरंग पुनिया यूडब्ल्यूडब्ल्यूच्या यादीत ९६ गुणांसह प्रथम क्रमांकावर विराजमान आहे. दुसऱ्या क्रमांकावर असेल्या कुस्तीपटूपेक्षा बजरंग ३० गुणांच्या अंतराने पुढे आहे. क्युबाचा एलेजांद्रो एनरिक व्लाडेस टोबियर ६६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. रशियाचा अखमद चाकेइव ६२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
बजरंगसाठी हा हंगाम शानदार राहिला आहे. तो बुडापेस्ट येथे होणाऱ्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत पात्रता मिळवणारा एकमेव भारतीय कुस्तीपटू राहिलाय. बजरंगची ही आतापर्यंतची सर्वात यशस्वी कामगिरी आहे. बजरंगने एशियाड गेम आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
पहिल्या दहा कुस्तीपटूंमध्ये बजरंग हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. महिला गटात भारताच्या पाच महिला कुस्तीपटूंनी आपापल्या गटांमध्ये अव्वल दहामध्ये स्थान प्राप्त केले आहे. पूजा ढांडा ५७ किलो गटामध्ये ५२ गुणांसह सहाव्या स्थानावर विराजमान आहे. तर रितू फोगाट ५९ किलो गटामध्ये २९ गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
‘आपण जगातला सर्वोत्तम कुस्तीपटू बनावं असं प्रत्येक अॅथलीटचं स्वप्न असतं. पण वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक पटकावून हे सर्वोत्तम स्थान मिळालं असतं तर मला आणखी आनंद झाला असता. पण मी खूप मेहनत घेत आहे आणि हा सर्वोत्तम रँक पुढील वर्षीही टिकवण्याचा मी प्रयत्न करेन,’ असं मनोगत बजरंगनं व्यक्त केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 10, 2018 5:05 pm