नवी दिल्ली : सुवर्णपदकाच्या जवळ पोहोचूनही हुकल्याची खंत भारताचा अव्वल मल्ल बजरंग पुनिया याने व्यक्त केली. हंगेरीतील बुडापेस्टमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये जपानच्या टाकुटो ओटुगुरो याच्याशी अंतिम झुंजीत पराभव पत्करावा लागल्याने बजरंगला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्या सामन्यात बजरंगला ९-१६ अशी मात खावी लागली.

‘‘या स्पर्धेत मी पूर्वी कांस्यपदक पटकावले होते, त्यामुळे त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी केल्याचा आनंद वाटतो; परंतु सुवर्णपदक हेच ध्येय ठेवून मी स्पर्धेत उतरलो असल्याने ते न मिळाल्याची खंत आहे,’’ असे रौप्यपदक विजेत्या बजरंगने नमूद केले.

बजरंगविरुद्धच्या सामन्यात टाकुटोने प्रारंभीच ५-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर बजरंगनेदेखील आक्रमक पवित्रा स्वीकारत ही दरी ६-७ अशी कमी केली होती. मात्र त्यानंतर टोकुटोने आघाडी वाढवत नेण्यास प्रारंभ करीत सामना ९-१६ अशा गुणांसह जिंकला. बजरंगने यंदाच्या वर्षी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. मात्र या स्पर्धेत त्याला रौप्यवर समाधान मानावे लागले. भारताकडून यापूर्वी केवळ सुशील कुमारने मॉस्कोत झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची कमाई करण्याची किमया केली आहे.

रितू, नवज्योतचे विजय

या स्पर्धेमध्ये भारताच्या रितू फोगट आणि नवज्योत कौर यांनी आतापर्यंत केवळ एकेकाच सामन्यात बाजी मारली. दोघीही रेपिचेज फेरीला गेल्या असल्याने पदक मिळण्याची आशा आहे. रितूला पदकप्राप्तीसाठी बल्गेरियाच्या सोफीया रिस्तोवा जॉरगिएवा आणि जपानच्या अयाना गेमपेईवर मात करावी लागणार आहे.