आशियाई  कुस्ती स्पर्धा

संघर्षपूर्ण अंतिम लढतीत ओकासोव्हवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बजरंग पुनियाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कमाल केली. अखेरच्या क्षणी पिछाडीवर असताना सलग १० गुणांची कमाई करत बजरंगने पुन्हा एकदा आशियाई स्पर्धेच्या सुवर्णपदाकाला गवसणी घातली.

पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत बजरंगने कझाकस्तानच्या सायाटबेक ओकासोव्ह याच्यावर १२-७ अशी सरशी साधली. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बजरंग शेवटच्या ६० सेकंदांचा खेळ शिल्लक असताना २-७ असा पिछाडीवर पडला होता. मात्र तीन वेळा कल्पक डाव आखत बजरंगने प्रतिस्पध्र्याला नामोहरम करत आठ गुणांची कमाई केली. अखेरच्या क्षणी पुन्हा एकदा आक्रमक खेळ करत दोन गुण पटकावून त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले.

कझाकस्तानचा ओकासोव्ह पूर्णपणे दमला असल्याचा फायदा बजरंगने उठवला. बजरंगने मात्र तणावाच्या स्थितीतही संयम ढळू न देता अतिशय चाणाक्ष पद्धतीने प्रतिस्पध्र्याला अस्मान दाखवले. बजरंगची ऊर्जा वाखाणण्याजोगी होती. बजरंगचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक तर पाचवे पदक ठरले. याआधी त्याने २०१७मध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

या कामगिरीसह आपण २०२० टोक्यो ऑलिम्पिकसाठी सुवर्णपदकासाठी भक्कम दावेदार असल्याचा इशारा बजरंगने आपल्या प्रतिस्पध्र्याना दिला आहे. अंतिम फेरीला सुरुवात होण्याआधी बजरंगने सर्व लढती जिंकत फक्त एकच गुण गमावला होता. त्याने उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या सिरोजिद्दीन खासानोव्ह याला १२-१ असे तर त्याआधी श्रीलंकेच्या चार्लेस फर्नला तांत्रिक गुणांच्या आधारावर पराभूत केले होते. सलामीच्या सामन्यात त्याने इराणच्या पेयमन बियाबानीचा ६-० असा धुव्वा उडवला होता.