सुवर्णपदकासह जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी

रोम :ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारतीय मल्ल बजरंग पुनियाने मॅट्टेओ पेलीकोन मानांकन कुस्ती स्पध्रेची अंतिम लढत ३० मिनिटांत जिंकून दुहेरी यश मिळवले. एक म्हणजे सुवर्णपदक टिकवले, तर दुसरे म्हणजे जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान पुन्हा प्राप्त केले.

६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीआधी मोंगोलियाच्या तुल्गा तुमूर ओशिरचे बजरंगविरुद्ध पारडे जड मानले जात होते. कारण आधीच्या दोन्ही लढतींत ओशिरकडून बजरंगने पराभव पत्करला होता. परंतु या अंतिम लढतीत ३० सेकंदांत बजरंगने बरोबरी साधली. परंतु अखेरचा गुण बजरंगने कमावल्यामुळे त्याला विजेता घोषित करण्यात आले.

करोनाच्या साथीमुळे एक वर्षांच्या विश्रांतीच्या कालावधीत बजरंगने पायाच्या बचावात वैशिष्टय़पूर्ण सुधारणा केली. परंतु टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी बचावावर अधिक मेहनत घ्यायला हवी, असे २७ वर्षीय बजरंगने सांगितले. बजरंग ९ ते ११ एप्रिल या कालावधीत कझाकस्तानला होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पध्रेत सहभागी होणार आहे. त्याआधी मात्र राष्ट्रीय शिबिरात त्याला सरावासाठी दाखल व्हावे लागेल. या स्पध्रेआधी ६५ किलो गटात बजरंग जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी होता. परंतु या स्पध्रेत १४ गुणांची कमाई करून त्याने अग्रस्थान मिळवले आहे.

बिगरऑलिम्पिक ७० किलो वजनी गटात विशाल कलिरमणाने कझाकस्तानच्या सिरबाझ तलगतचा ५-१ असा पाडाव करून कांस्यपदक पटकावले. चार वर्षांच्या बंदीनंतर स्पर्धात्मक कुस्तीमध्ये पुनरागमन करणाऱ्या नरसिंग यादवला कांस्यपदकाने हुलकावणी दिली. कझाकस्तानच्या डॅनियार कॅसानोव्हने त्याचा ५-० असा पराभव केला.

मॅट्टेओ पेलीकोन आंतरराष्ट्रीय मानांकन कुस्ती स्पध्रेत भारताने ७ पदके कमावली.

सुवर्ण : बजरंग पुनिया, विनेश फोगट

रौप्य : सरिता मोर

कांस्य : विशाल कलिरमणा, नीरज, कुलदीप मलिका, नवीन