करोना साथीच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेली टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रद्द होण्याच्या अफवांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी  फे टाळून लावले आहे.

यंदा २३ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, परंतु जपानमधील करोनाची स्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने या वेळी ऑलिम्पिक रद्दच करावे लागेल, अशा  आशयाचे वृत्त इंग्लंडमधील अग्रगण्य वृत्तपत्राने दिले. त्याशिवाय त्यांनी बातमीमध्ये एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याचे नाव वापरल्याने चाहत्यांमध्ये स्पर्धेच्या आयोजनावरून विविध चर्चाना सुरुवात झाली, परंतु बाख यांनी अशा बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे क्रीडाप्रेमींना आवाहन के ले आहे.

‘‘टोक्यो ऑलिम्पिक रद्द करण्यात आले आहे, असे आमच्यापैकी कोणीही अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांत येणाऱ्या वृत्तांवर कोणीही विश्वास ठेवू नये. किंबहुना आम्ही ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून यासंबंधी शासनालाही आम्ही कल्पना दिली आहे,’’ असे बाख म्हणाले.

यासंबंधी टोक्योचे राज्यपाल युरिको कोइके म्हणाले की, ‘‘मी कोणत्याही प्रकारच्या वृत्तपत्राला तसेच वृत्तवाहिनीला टोक्यो ऑलिम्पिक रद्द करण्याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे माझ्या नावाचा उल्लेख केल्याबद्दल मी त्या वृत्तपत्राविषयी तक्रार केली आहे.’’