नवी दिल्ली : गंगोम बाला देवी स्कॉटलंडमधील रेंजर्स एफसी या क्लबशी करारबद्ध झाली आहे. मणिपूरची आघाडीवीर बाला देवी ही परदेशी क्लबशी करारबद्ध झालेली पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू ठरली आहे.

रेंजर्स महिला संघाने २९ वर्षीय बाला देवी हिच्याशी १८ महिन्यांचा करार केला आहे. ‘‘१० क्रमांकाच्या जर्सीसह खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. माझ्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय संघातील अनेक महिला फुटबॉलपटू युरोपमध्ये खेळतील, अशी आशा आहे. युरोपियन फुटबॉल स्पर्धामध्ये खेळण्याचे स्वप्न मी लहानपणापासूनच उराशी बाळगले होते. आता मला ती संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करण्याचा तसेच आपल्या गुणवत्तेची छाप पाडण्याचा मी प्रयत्न करणार आहे,’’ असे बाला देवीने सांगितले.

बाला देवीने भारतातर्फे सर्वाधिक गोल करण्याची किमया साधली आहे. तिच्या नावावर ५८ सामन्यांत ५२ गोल जमा आहेत. दक्षिण आशिया विभागातील ती सर्वाधिक गोल करणारी एकमेव खेळाडू आहे. वयाच्या १५व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या बाला देवीने भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्वही सांभाळले आहे. गेल्या दोन मोसमांपासून भारतीय महिला फुटबॉल लीगमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा मान तिने पटकावला आहे. तिने २०१५ आणि २०१६मध्ये अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचा सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावला आहे.

सध्या मला काय वाटत आहे, हे शब्दांत सांगता येणार नाही. युरोपमध्ये खेळण्याचे माझे स्वप्न साकार होणार आहे. रेंजर्स क्लबचा इतिहास, परंपरा आणि कामगिरी समृद्ध अशी असून या क्लबकडून खेळताना अभिमानास्पद वाटणार आहे – बाला देवी