फिरकीच्या या ठेवणीतल्या अस्त्राच्या आधारे भारताने पहिली कसोटी जिंकली, मात्र तरीही भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळपट्टय़ांबाबत समाधानी नाही. कसोटीच्या पहिल्या दिवसापासून चेंडू वळायला हवे असे परखड मत धोनीने विजयानंतर बोलताना व्यक्त केले.
मला ही खेळपट्टी पाहावीशीसुद्धा वाटत नाही. या खेळपट्टीवर चेंडू फारसा वळत नव्हता आणि चेंडूला उसळीही मिळत नव्हती. येत्या सामन्यांमध्ये पहिल्या दिवसापासून खेळपट्टीवर चेंडू वळेल आणि नाणेफेकीचे महत्त्व कमी होईल.
दोन चांगल्या संघांमधील लढत होणे अपेक्षित आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला मिळणारा फायदा हा मुद्दाच निकालात निघायला हवा. चेंडू पहिल्या दिवसापासून वळत असेल तर सामनाधिकारी का आक्षेप घेतील? जेव्हा अन्य खेळपट्टय़ांवर चेंडू पहिल्या दिवसापासून स्विंग होतो तेव्हा आक्षेप घेतला जात नाही मग फिरकीला मदत देणाऱ्या खेळपट्टीला आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.