ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरोधात खेळात एक वेगळाच डाव रचत बॉल टॅम्परिंग म्हणजेच चेंडू कुरतडण्याची रणनिती आखली होती. खुद्द ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानेच याविषयीची कबुली दिली होती. ज्यानंतर संपूर्ण ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघावर टीकेची झोड उठवण्यात आली. एका चुकीच्या डावामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वालाच काळा डाग लागल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या. तर, स्मिथ चुकला असं म्हणतही काही दिग्गजांनी आपलं मत मांडलं. या प्रकरणात टीव्ही पंच असलेल्या इयन गुल्ड यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

बॉल टॅम्परिंगप्रकरणी बोलताना गुल्ड म्हणाले की मी जेव्हा टीव्हीवर चेंडू कुरडतला जातोय हे डोळ्याने पाहिले तेव्हा माझाही यावर विश्वास बसला नाही. मला नक्की काय सुरू आहे हे कळत नव्हते. पण महत्त्वाचे म्हणजे हे प्रकरण होण्याच्या दोन – तीन वर्षे आधीपासूनच ऑस्ट्रेलियाचा संघ बेलगाम होता. त्यांचे मैदानावरील आचरण, वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत या सगळ्याच बाबींमध्ये ते बेलगाम होते, असे गुल्ड यांनी आपले आत्मचरित्र माय लाईफ इन क्रिकेट या पुस्तकाबाबत बोलताना सांगितले.

या प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की जेव्हा माझ्या हे प्रकरण पूर्णपणे कानावर आले तेव्हा मला याची खात्री होती की ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान या तिघांबाबत कठोर निर्णय घेणार नाहीत. त्यामुळे माझ्या डोक्यात केवळ एक विचार होता की मी हे प्रकरण कसे हाताळावे जेणेकरून त्यात कोणतीही अतिशयोक्ती आढळणार नाही. तुमच्याकडे जेव्हा साऱ्यांचे लक्ष असते तेव्हा निर्णय घेणे सगळ्यात कठीण असते.
दरम्यान, चेंडू कुरतडल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर वर्षाची क्रिकेटबंदी घातली होती, तर कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट याच्यावर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.