कारकीर्दीतील सहाव्या ‘बलोन डी ओर’ पुरस्कारावर मोहोर; महिलांमध्ये अमेरिकेच्या रॅपिनोचे वर्चस्व

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मुकुट अभिमानाने मिरवणाऱ्या बार्सिलोनाच्या लिओनेल मेसीने मंगळवारी विक्रमी सहाव्यांदा ‘बलोन डी ओर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर नाव कोरले. महिलांमध्ये विश्वविजेत्या अमेरिकेची खेळाडू मेगान रॅपिनोने कारकीर्दीत पहिल्यांदाच या पुरस्काराला गवसणी घातली.

पॅरिसमधील श्ॉटलेट थिएटर येथे झालेल्या या सोहळ्यात मेसीने यंदाच्या चॅम्पियन्स लीगमधील लिव्हरपूलचा सर्वोत्कृष्ट खेळाडू व्हर्गिल व्हॅन डिक आणि पोतुर्गाल व युव्हेंटसचा नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यावर मात करून हा पुरस्कार पटकावला.

२०१९ या वर्षांत अर्जेटिना आणि बार्सिलोना संघाकडून खेळताना मेसीने सर्वाधिक ५४ गोल केले आहेत. त्याचप्रमाणे बार्सिलोनाला ला लिगाचे विजेतेपद आणि चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून देण्यात मेसीचा सिंहाचा वाटा होता. मेसीने सर्वाधिक ६८६ गुण मिळवले, तर व्हॅन डिक आणि रोनाल्डो यांना अनुक्रमे ६७९ आणि ४७६ गुणांवर समाधान मानावे लागले. ३२ वर्षीय मेसीच्या खात्यात आता सर्वाधिक ‘बलोन डी ओर’ जमा असून रोनाल्डो पाच पुरस्कारांसह या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. मेसीने २००९ ते २०१२ आणि २०१५ या पाच वर्षांत या पुरस्कारावर मोहोर उमटवली होती. ३४ वर्षीय रॅपिनोने महिलांमध्ये हा पुरस्कार पटकावताना इंग्लंडची लुसी ब्राँज आणि अमेरिकेचीच अ‍ॅलेक्स मॉर्गन यांना पिछाडीवर टाकले. जुलैमध्ये झालेल्या महिलांच्या फिफा विश्वचषकात अमेरिकेला सलग दुसऱ्यांदा जगज्जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या रॅपिनोने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला होता. त्याचप्रमाणे तिने विश्वचषकात सर्वाधिक गोलही केले होते.

मात्र वैयक्तिक कारणामुळे रॅपिनो या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकली नाही. मेसी मात्र त्याची पत्नी अँटोनेला रोकूझो आणि दोन मुलांसह उपस्थित होता. गतवर्षीचा ‘बलोन डी ओर’ विजेता क्रोएशियाच्या लुका मॉड्रिचच्या हस्ते मेसीला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • आयएक्स संघाला चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीपर्यंत नेण्यात बहुमूल्य योगदान देणाऱ्या मॅथिग्स डी लेट हा वर्षांतील सर्वोत्तम युवा खेळाडूला दिला जाणाऱ्या ‘कोपा’ पुरस्काराचा मानकरी ठरला.
  • सध्या युव्हेंटसकडून खेळणाऱ्या डी लेटने बोरुशिया डॉर्टमंडच्या जेडॉन सँचोला मागे टाकले.
  • ब्राझील आणि लिव्हरपूलचे प्रतिनिधित्व करणारा अ‍ॅलिसन बेकर वर्षांतील सर्वोत्तम गोलरक्षक ठरला. त्याला ‘याशिन’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
  • ४ मेसीने चार वर्षांनंतर प्रथमच ‘बलोन डी ओर’ किताब मिळवला. यापूर्वी २०१५ मध्ये त्याने हा पुरस्कार मिळवला होता. २०१६ आणि २०१७ मध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर २०१८ मध्ये त्याची चक्क पाचव्या स्थानी घसरण झाली होती.

२मेसी

आणि रॅपिनो यांनी वर्षांतील दुसऱ्या प्रतिष्ठित पुरस्काराची कमाई केली. जुलै महिन्यात दोघांनीही अनुक्रमे ‘फिफा’च्या वर्षांतील सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला पुरस्कारावर नाव कोरले होते. १२०१० नंतर प्रथमच रोनाल्डोला ‘बलोन डी ओर’च्या शर्यतीत पहिल्या दोन खेळाडूंमध्ये स्थान मिळवता आले नाही.

२००९ साली पॅरिसमध्येच मी कारकीर्दीत पहिल्यांदा ‘बलोन डी ओर’ किताब मिळवला होता. त्या वेळी स्वप्नातही विचार केला नव्हता की पुढील १० वर्षे मी फुटबॉल खेळू शकेन. कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले. त्यामुळे मी पुढील काही वर्षे नक्कीच फुटबॉलचा आनंद लुटेन. – लिओनेल मेसी, ‘बलोन डी ओर’ पुरस्कार विजेता