यंग प्रभादेवी क्रीडा मंडळातर्फे हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेच्या कुमार गटात मुंबईच्या विजय क्लबने १२ गुणांच्या फरकाने यंदाच्या उपनगर जिल्हा अजिंक्यपद विजेत्या बालमित्र क्रीडा मंडळाला पराभवाचा धक्का दिला. बुधवारी भिवंडीच्या मनोज क्रीडा मंडळाला पराभूत करून बालमित्रने विजयी सलामी नोंदवली होती. गुरुवारी मध्यंतराला बालमित्रने ७-२ अशी अपेक्षेप्रमाणेच आघाडी घेतली होती. परंतु उत्तरार्धात सामन्याचे फासे विजय स्पोर्ट्स क्लबकडे फिरले. विजय स्पो. क्लबने २४-१२ असा आश्चर्यकारक विजय मिळवला. विजयी संघाकडून अजिंक्य काप्रेने एका चढाईत तीन गुण मिळवून उत्तरार्धात रंगत आणली. अभिषेक रहाटेने पोलादी पकडी करीत संघाला चांगले गुण मिळवून दिले. बालमित्रकडून सूरज रानताणेने चढायांचा आणि रवींद्र दिनगावकरने पकडींचा अप्रतिम खेळ केला.
इ गटाच्या सामन्यात जय भारत क्रीडा मंडळाने वीर परशुराम क्रीडा मंडळाचा फक्त एका गुणाने रोमहर्षक पराभव केला. प्रारंभीपासून रंगतदार झालेल्या सामन्यात मध्यंतराला जय भारतने ८-७ अशी अवघ्या एका गुणाची आघाडी घेतली होती. उत्तरार्धातही क्षणाक्षणाची उत्कंठा वाढविणाऱ्या या सामन्यात अखेर जय भारत संघाने २३-२२ अशी वीर परशुराम संघावर मात केली. जय भारतकडून अतिश करकाटे आणि देवेंद्र गोसावी यांनी दमदार चढाया केल्या, तर अविनाश काविलकर यांनी अप्रतिम पकडी केल्या. वीर परशुरामकडून वैभव शिंदे आणि आदेश सावंत यांनी दमदार खेळ केला.