मॅँचेस्टर सिटीवरील बंदीच्या निर्णयाने धक्का बसल्याची प्रतिक्रिया लिव्हरपूलचे प्रशिक्षक जुर्जेन क्लॉप यांनी व्यक्त केली आहे. लिव्हरपूल आणि मॅँचेस्टर सिटी हे सध्याचे प्रबळ प्रतिस्पर्धी आहेत. या स्थितीत क्लॉप यांची मॅँचेस्टर सिटीबाबतची प्रतिक्रिया महत्त्वपूर्ण आहे. यंदा ३० वर्षांनंतर इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.

‘‘फुटबॉलच्या मैदानावर मॅँचेस्टर सिटीची कामगिरी वर्षांनुवर्षे संस्मरणीय राहिलेली आहे. सिटीच्या खेळाडूंविरुद्धच्या लढतींच्या माझ्या आठवणीदेखील बऱ्याच आहेत. पेप आणि त्यांच्या खेळाडूंबाबत मला सहानुभूती वाटते. आता त्यांनी त्यांच्यावरील दोन वर्षांच्या बंदीला आव्हान दिले आहे. तेव्हा पाहू या काय होते ते,’’ असे क्लॉप यांनी म्हटले.

क्लॉप यांच्याप्रमाणेच फुटबॉल जगताने सिटीवरील बंदीबाबत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. मॅँचेस्टर सिटीवर दोन वर्षांची बंदी कायम राहिल्यास इंग्लिश प्रीमियर लीगसह चॅँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील चुरस कमी होईल, अशी मते फुटबॉल जगताकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

इंग्लिश प्रीमियर लीगचा विद्यमान विजेता आणि जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉल क्लब अशी मॅँचेस्टर सिटीची ओळख आहे. मँचेस्टर सिटीवर युरोपियन फुटबॉलमधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. युरोपियन फुटबॉल महासंघाने (यूएफा) केलेल्या या कारवाईमुळे आता मँचेस्टर सिटीला युरोपमधील कोणत्याही स्पर्धामध्ये पुढील दोन वर्षे खेळता येणार नाही. मात्र मँचेस्टर सिटीने या बंदीविरोधात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

मँचेस्टर सिटीला दोन वर्षे बंदी तसेच तीन कोटी युरोचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र या बंदीविरोधात लवकरात लवकर क्रीडा लवादाकडे दाद मागण्याचे मँचेस्टर सिटीने ठरवले आहे. मँचेस्टर सिटीने अनेक नियमांचे उल्लंघन केले असून त्यात क्लब परवाना तसेच आर्थिक खेळभावना नियमांचा समावेश आहे. मँचेस्टर सिटीने या प्रकरणाची चौकशी करणाऱ्यांनाही सहकार्य केले नाही, असे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत.

या बंदीच्या कारवाईमुळे यंदा त्यांच्या चॅम्पियन्स लीगमधील सहभागावर टाच येणार नाही. पेप गार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मँचेस्टर सिटीचा चॅम्पियन्स लीगमधील उपउपांत्यपूर्व फेरीतील सामना रेयाल माद्रिदशी होणार आहे.