नवनिर्वाचित अध्यक्ष बीव्हीपी राव यांनी आंतरराष्ट्रीय तिरंदाजी महासंघाशी वाटाघाटी सुरू केल्यानंतर आता भारतीय तिरंदाजी संघटनेवरील (एएआय) बंदीची टांगती तलवार दूर होणार आहे. भारतीय संघटना आणि आंतरराष्ट्रीय संघटनेत संवाद होऊ लागल्यामुळे एएआयवर बंदी लादण्यात येणार नाही, असे आंतरराष्ट्रीय महासंघाने जाहीर केल्यामुळे भारतीय तिरंदाजांना दिलासा मिळाला आहे.

राव यांनी जागतिक तिरंदाजी संघटनेचे सरचिटणीस टॉम डिल्लन यांची स्वित्र्झलडमध्ये भेट घेऊन प्रस्तावित नूतन नियमावलीतील संभाव्य बदलांबाबतची त्यांची मते सांगितले. भारतीय संघटना ही जागतिक संघटनेची सभासद असून त्यांच्यावर कोणताही दंड किंवा निलंबन कारवाई केली जाणार नसल्याचे जागतिक संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. क्रीडा धोरणाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय तिरंदाजी संघटना २०१२ साली निलंबित करण्यात आली होती. त्यानंतर आता नव्याने संघटना स्थापन करण्यात आली आहे.