राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची मागणी

वयचोरी करणाऱ्या खेळाडूंवर भारतीय बॅडमिंटन महासंघाने बंदी घालावी, जेणेकरून चुकीचे काम करणाऱ्या खेळाडूंवर वचक बसेल आणि भविष्यात चांगले परिणाम दिसून येतील, अशी मागणी भारताचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी केली आहे.

‘‘माझ्या मते, महासंघाने कठोर निर्णय घेऊन वयचोरी करणाऱ्या खेळाडूंसमोर कठोर उदाहरण ठेवायला हवे. त्यामुळे खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे. तसे झाल्यास, देशांतर्गत स्पर्धामध्ये वयचोरीचे प्रमाण कमी होईल,’’ असे गोपीचंदने सांगितले.

भारतीय क्रीडाक्षेत्रात सध्या वयचोरीची समस्या चांगलीच भेडसावत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि भारतीय टेबल टेनिस महासंघाने वयचोरी करणाऱ्या खेळाडूंवर बंदी घालण्याचे कडक र्निबध लादले आहेत. मात्र भारताचे माजी बॅडमिंटन प्रशिक्षक विमल कुमार यांनी खेळाडूंवर बंदी घालण्याला विरोध दर्शवला आहे.

‘‘खेळाडूंवर २ ते ३ वर्षांसाठी बंदी घालणे योग्य ठरणार नाही. तसे झाल्यास त्यांच्यातील गुणवत्ता मारली जाईल. जर एखादा खेळाडू १५, १७, १९ वर्षांखालील गटात वयचोरी करत असेल आणि त्याच्याविरोधात सबळ पुरावे तुमच्याकडे असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई करायला हवी. पण ती कारवाई म्हणजे त्याला कोणत्याही वयोगटात खेळू न देता फक्त खुल्या गटात खेळण्याची परवानगी द्यावी,’’ असे विमल कुमार यांनी सांगितले. विमल कुमार यांच्या प्रशिक्षकपदाखाली सायना नेहवालने २०१५ साली जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती.

२०१६मध्ये चार कनिष्ठ गटातील खेळाडूंनी आपला वयाच्या दाखल्यात फेरफार केला होता, त्याबाबतचा अहवाल केंद्रीय अन्वेषण विभागाने भारतीय बॅडमिंटन महासंघाकडे दाखल केला होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात उदयोन्मुख खेळाडूंच्या ३७ पालकांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करत वयचोरीबाबत कठोर निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोन-दोन प्रमाणपत्रे आपल्याजवळ बाळगणाऱ्या या खेळाडूंवर कारवाई करत महासंघाने त्यांना आपल्या वयाबाबतचा वैद्यकीय अहवाल सादर करण्यास सांगितले होते.