आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे स्पष्टीकरण

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) आचारसंहितेनुसार सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत भारतीय ऑलिम्पिक संघटनेवरील (आयओए) बंदी कायम राहील, असे आयओसीने आयओएला पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. ‘‘आयओसीच्या आचारसंहितेनुसार निवडणुका आयोजित करणे, आयओसीची तत्त्वे पाळणे आणि संघटनेत स्वच्छ चरित्र असलेल्यांना संधी देणे तसेच दैनंदिन कारभार स्वच्छ असणे, या मागण्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेला पूर्ण कराव्या लागतील. बंदीदरम्यान आयओएला कोणताही कार्यक्रम राबवण्याची परवानगी मिळणार नाही. तसेच त्यांना देण्यात येणारा निधीही रोखला जाईल. आयओसीशी संलग्न असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील भारतीय खेळाडूंच्या सहभागाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल,’’ असे आयओसीचे अध्यक्ष जॅक रॉग यांनी आयओएचे हंगामी अध्यक्ष व्ही. के. मल्होत्रा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.