ख्रिस गेल, विराट कोहली, ए बी डीव्हिलियर्स, दिलशान असे एकापेक्षा एक स्फोटक फलंदाज ताफ्यात असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे बाद फेरीचे तिकीट पक्केझालेले नाही. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या आधीच्या लढतीत डेव्हिड मिलरने अविश्वसनीय शतक झळकावत बंगळुरूवर हल्लाबोल केला होता. या धक्कादायक पराभवाची परतफेड करण्यासाठी बंगळुरूचा संघ आतुर आहे. मात्र शेवटच्या लढतीत विजयासाठी झगडणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सने बंगळुरूवर मात केल्याने त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम झाला आहे.
बाद फेरीत धडक मारण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला उर्वरित दोन्ही सामन्यांत विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे.
ख्रिस गेलकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्या शतकानंतर गेलला लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. गेलेला सूर गवसतो तेव्हा चॅलेंजर्सची गाडी रुळावर येते असे चित्र आहे. त्यामुळे बाद फेरीत आगेकूच करण्यासाठी गेलला सूर गवसणे बंगळुरूसाठी महत्त्वाचे आहे. विराट कोहलीला सातत्य राखण्यात अपयश आले आहे. ए बी डीव्हिलियर्स बंगळुरूसाठी तुरुप का एक्का ठरू शकतो. दुखापतीतून सावरून पुनरागमन करणारा चेतेश्वर पुजाराकडून संयमी खेळीची अपेक्षा आहे. गोलंदाजीची ढासळती कामगिरी बंगळुरूसाठी चिंतेचा विषय आहे.
रवी रामपॉल, आर. पी. सिंग, वियन कुमार, मुरलीधरन या सगळ्यांच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत धावांची लयलूट होत असल्याने कर्णधार कोहलीच्या चिंता वाढल्या आहेत. पुढच्या फेरीत जाण्याचे उद्दिष्ट असेल तर बंगळुरूला गोलंदाजी मजबूत करावी लागेल.
दुसरीकडे पंजाबच्या संघाला कामगिरीत सातत्य आणावे लागणार आहे. बंगळुरूविरुद्धच्या तुफानी शतकी खेळीनंतर डेव्हिड मिलर अपयशी ठरला आहे. दुखापतीतून सावरत शॉन मार्शने पुनरागमन केले आहे. या ऑस्ट्रेलियन जोडीवर पंजाबची मोठी भिस्त आहे. अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि डेव्हिड हसी दोघांनाही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. युवा मनदीप सिंगने सुरुवातीच्या सामन्यांत चमकदार कामगिरी केली. मात्र त्यानंतर त्याच्या कामगिरीत घसरण झाली आहे. अष्टपैलू अझर मेहमूदला संघाला विजय मिळवून देण्यासाठी विशेष कामगिरी करावी लागणार आहे. परविंदर अवाना, पीयूष चावला, हरमीत सिंग, भार्गव भट यांच्यावर चिन्नास्वामी स्टेडियमवर गेलचे वादळ रोखण्याचे आव्हान असेल.

सामना : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब
ठिकाण : चिन्नास्वामी स्टेडियम
वेळ : दुपारी ४ पासून