डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रहमानच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय क्रिकेट संघाने सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नांगी टाकली. पावसाच्या व्यत्ययाचा फटका बसलेल्या या सामन्यात भारताचा डाव फक्त २०० धावांत संपुष्टात आला. त्यानंतर बांगलादेशने सहा विकेट्स राखून ३८ षटकांतच विजयाची नोंद केली आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० असे प्रभुत्व प्राप्त केले. त्यामुळे घरच्या मैदानावर सलग दहा सामने जिंकणाऱ्या बांगलादेशने विजयादशमी जल्लोषात साजरी केली. सामनावीर रहमानने ४३ धावांत ६ बळी घेत या विजयात सिंहाचा वाटा उचलला. तर शाकिब अल हसनने नाबाद अर्धशतकी खेळी साकारली.
विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत उपांत्यपूर्व फेरी गाठून बांगलादेशने ‘लिंबू-टिंबू’ हा शिक्का पुसला होता. त्यानंतर बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० असे वर्चस्व प्राप्त केले होते. हीच विजयी घोडदौड कायम राखताना भारतासारख्या एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल राष्ट्राला चारी मुंडय़ा चीत करण्याची किमया साधली.
भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पदार्पणातच पाच बळी घेत सामनावीर पुरस्काराला गवसणी घालणाऱ्या रहमानने दुसऱ्या सामन्यातसुद्धा आपला करिष्मा दाखवला आणि बळींची संख्या ११पर्यंत नेली. कारकीर्दीतील पहिल्या दोन सामन्यांत पाच बळी घेण्याचा पराक्रम ब्रायन व्हेटोरीच्या नावावर होता. त्या विक्रमाची रहमानने बरोबरी साधली. भारताकडून शिखर धवनने (५३) अर्धशतकी खेळी साकारली. त्याव्यतिरिक्त कर्णधार महेंद्रसिंग धोनी (४७) आणि सुरेश रैना (३४) यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना फारसे यश मिळाले नाही.
मागील सामन्यात धावांचा पाठलाग करताना अपयशी ठरलेल्या भारताने रविवारी नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु रोहित शर्माला रहमानने भोपळासुद्धा फोडू दिला नाही. त्यानंतर धवनने विराट कोहलीसोबत ७४ धावांची भागीदारी केली. तर धोनीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली. अंबाती रायुडूसुद्धा शून्यावर तंबूत परतला. त्यानंतर धोनीने चिवट फलंदाजीचा प्रत्यय घडवत सुरेश रैनासोबत पाचव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी रचली. रैना बाद झाला आणि त्यानंतर उर्वरित भारतीय फलंदाजांना फार काळ खेळपट्टीवर टीकाव धरता आला नाही. भारताचे उर्वरित सहा फलंदाज फक्त ३७ धावांत बाद झाले. पावसामुळे खेळाचे नुकसान झाल्यामुळे आता बांगलादेशला विजयासाठी ४७ षटकांत २०० धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे.
त्यानंतर सौम्या सरकार (३४), लिट्टॉन दास (३६), मुशफिकर रहिम यांनी दमदार फलंदाजी आणि भागीदाऱ्या करीत बांगलादेशच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर हसन (नाबाद ५१) आणि शब्बीर रहमान (नाबाद २२) यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ४८ धावांची भागीदारी करीत बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. सब्बीर रहमान गो. मुस्ताफिझूर रहमान ०, शिखर धवन झे. दास गो. नासिर हुसैन ५३, विराट कोहली पायचीत गो. नासिर हुसैन २३, महेंद्रसिंग धोनी झे. सरकार गो. मुस्ताफिझूर रहमान ४७, अंबाती रायुडू झे. नासिर हुसैन गो. रुबेल हुसैन ०, सुरेश रैना झे. दास गो. मुस्ताफिझूर रहमान ३४, रवींद्र जडेजा त्रि. गो. मुस्ताफिझूर रहमान १९, अक्षर पटेल पायचीत गो. मुस्ताफिझूर रहमान ०, आर. अश्विन झे. दास गो. मुस्ताफिझूर रहमान ४, भुवनेश्वर कुमार झे. दास गो. रुबेल हुसैन ३, धवल कुलकर्णी नाबाद २, अवांतर (लेगबाइज ६, वाइड ८, नोबॉल १), एकूण ४५ षटकांत सर्व बाद २००
बाद क्रम : १-०, २-७४, ३-१०९, ४-११०, ५-१६३, ६-१७४, ७-१७४, ८-१८४, ९-१९६, १०-२००
गोलंदाजी : मुस्ताफिझूर रहमान १०-०-४३-६, तस्किन अहमद ४-०-२४-०, मश्रफी मुर्तझा ७-०-३५-०, नासिर हुसैन १०-०-३३-२, रुबेल हुसैन ७-०-२६-२, शाकिब अल हसन ७-०-३३-०
बांगलादेश : तमीम इक्बाल झे. धवन गो. कुलकर्णी १३, सौम्या सरकार पायचीत गो. अश्विन ३४, लिट्टॉन दास झे. धोनी गो. पटेल ३६, मुशफिकर रहिम धावचीत ३१, शाकिब अल हसन नाबाद ५१, शब्बीर रहमान नाबाद २२, अवांतर (लेगबाइज ४, वाइड ९) १३, एकूण ३८ षटकांत ४ बाद २००
बाद क्रम : १-३४, २-८६, ३-९८, ४-१५२
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ५-०-३२-०, धवल कुलकर्णी ७-०-४२-१,  आर. अश्विन १०-२-३२-१, रवींद्र जडेजा ७-०-२८-०, अक्षर पटेल ७-०-४८-१, सुरेश रैना २-०-१४-०