पाकिस्तानवर पाच विकेट्सने मात

सामन्यात चांगलीच चुरस निर्माण झाली होती. बांगलादेशला विजयासाठी तीन षटकांमध्ये २६ धावांची गरज होती, तर पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीकडे मोहम्मद आमिर आणि मोहम्मद सामी यांच्यासारखे भरवश्याचे गोलंदाज होते. पाकिस्तानचे पारडे जड समजले जात असले तरी बांगलादेशच्या खेळाडूंनी जिगरबाज खेळ केला. त्यांनी आमिरच्या १८ व्या षटकात त्यांनी दोन चौकार वसूल केले. तर सामीच्या १९ व्या षटकात १५ धावांची लूट करत बांगलादेशच्या फलंदाजांनी सामना आपल्या बाजूने झुकवला. अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर महुमहदुल्लाहने चौकार खेचला आणि शेर ए बांगला स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. हा जल्लोष होता बांगलादेशच्या जिद्दीचा, चिकाटीचा, विजयाचा आणि अंतिम फेरीत स्थान मिळवल्याचा. या सामन्यात पाकिस्तानवर पाच विकेट्सने विजय मिळवत बांगलादेशने अंतिम फेरीत धडक मारली. पाकिस्तानच्या गोलंदाजीचा चोख सामना करत ४८ धावांची खेळी साकारणाऱ्या सौम्य सरकारला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली खरी, पण बांगलादेशने भेदक मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजांची पहिली फळीच भेदली आणि त्यांची ४ बाद २८ अशी दयनीय अवस्था केली. पण त्यानंतर सर्फराझ अहमद आणि शोएब मलिक यांनी पाचव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचत संघाला स्थैर्य मिळवून दिले. शोएब बाद झाल्यावर ही जोडी फुटली, पण सर्फराझने पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५८ धावांची खेळी साकारत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

या स्पर्धेत पाकिस्तानने सुरुवातीच्या षटकांमध्येच प्रतिस्पध्र्याना धक्के दिले होते. पण सलामीवीर सौम्यने पाकिस्तानच्या गोलंदाजांच्या चांगला सामना करत बांगलादेशच्या विजयाचा पाया रचला. सौम्यने पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४८ धावांची खेळी साकारत संघाला विजयाचा मार्ग दाखवला. सौम्य बाद झाल्यावर मुहमुदुल्लाह (नाबाद २२) आणि मश्रफी मुतर्झा (नाबाद १२) यांनी अखेरच्या षटकांमध्ये झंझावाती फलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान : २० षटकांत ७ बाद १२९ (सर्फराझ अहमद नाबाद ५८, शोएब मलिक ४१; अल अमिन होसेन ३/२५) पराभूत वि. बांगलादेश : १९.१ षटकांत ५ बाद १३१ (सौम्य सरकार ४८; मोहम्मद आमीर २/२६).