अनामुल हकचे दमदार शतक आणि अब्दुर रझ्झाक आणि सोहाग गाझी यांच्या शानदार फिरकीच्या जोरावर बांगलादेशने एकदिवसीय क्रिकेटमधल्या सगळ्यात मोठय़ा विजयाची नोंद केली. १९ वर्षीय अनामुल हकने कारकीर्दीतील दुसऱ्याच सामन्यात १३ चौकार आणि २ षटकारांसह १२० धावांची खेळी साकारली. कर्णधार मुशफिकर रहीमने ८ चौकार आणि एका षटकारासह ७९ धावा फटकावल्या. या दोघांच्या फटकेबाजीमुळे बांगलादेशने २९२ धावांची मजल मारली. वेस्ट इंडिजतर्फे रवी रामपॉलने ४९ धावांत ५ बळी टिपले. प्रत्युत्तरादाखल खेळताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी रझ्झाक आणि गाझी यांच्या गोलंदाजीसमोर शरणागती पत्करली. वेस्ट इंडिजचा डाव १३२ धावांतच संपुष्टात आला आणि बांगलादेशने १६० धावांनी दणदणीत विजय मिळवला. रझ्झाकने १९ धावांत ३ तर गाझीने २१ धावांत ३ बळी टिपले. वेस्ट इंडिजतर्फे डॅरेन ब्राव्होने सर्वाधिक २८ धावा केल्या. या विजयासह बांगलादेशने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. शतकवीर अनामुल हकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.