भारत-बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसालासुद्धा पावसाचा फटका बसला; परंतु पावसाने उसंत घेतल्यावर झालेल्या खेळात मुरली विजयच्या दीडशतकी खेळीच्या बळावर भारताने ६ बाद ४६२ अशी दमदार मजल मारली. बांगलादेशकडून डावखुरा फिरकी गोलंदाज शाकिब अल हसनने अप्रतिम गोलंदाजी (१०५ धावांत ४ बळी) केली.
पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला, तेव्हा रविचंद्रन अश्विन २ आणि हरभजन सिंग ७ धावांवर खेळत होते. उपाहारानंतर भारताने मुरली विजयला (१५०) गमावले. शाकिबने त्याला पायचीत करून संघाला महत्त्वाचे यश मिळवून दिले. विजयने अजिंक्य रहाणेसोबत ११४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. रहाणे (९८) चौथे कसोटी शतक झळकावण्यात अपयशी ठरला. शाकिबने त्याचा त्रिफळा उडवला.
लेग-स्पिनर जुबैर हुसैनने (११३ धावांत २ बळी) चांगली गोलंदाजी करीत भारताचा कर्णधार विराट कोहली (१४) आणि वृद्धिमान साहा (६) यांना तंबूची वाट दाखवली.
त्याआधी, बिनबाद २३९ धावसंख्येवरून भारताने आपल्या डावाला पुढे प्रारंभ केला. दुसऱ्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसामुळे होऊ शकला नव्हता. त्यामुळे तिसऱ्या दिवशी अर्धा तास लवकर खेळ सुरू झाला. शाकिबने शिखर धवनचा (१७३) स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल टिपून संघाला पहिले यश मिळवून दिले. विजयने मग सावधपणे खेळत आपले सहावे कसोटी शतक साकारले.
धावफलक
भारत (पहिला डाव) : मुरली विजय पायचीत गो. शाकिब १५०, शिखर धवन झे. आणि गो. शाकिब १७३, रोहित शर्मा त्रिफळा गो. शाकिब ६, विराट कोहली त्रिफळा गो. जुबैर १४, अजिंक्य रहाणे त्रिफळा गो. शाकिब ९८, वृद्धिमान साहा त्रिफळा गो. जुबैर ६, आर. अश्विन खेळत आहे २, हरभजन सिंग ७, अवांतर (बाइज ४, लेगबाइज १, नोबॉल १) ६, एकूण १०३.३ षटकांत ६ बाद ४६२
बाद क्रम : १-२८३, २-२९१, ३-३१०, ४-४२४, ५-४४५, ६-४५३
गोलंदाजी : मोहम्मद शहिद २२-२-८८-०, सौम्य सरकार ३-०-११-०, शुवागाता होम १४-०-५२-०, शाकिब अल हसन २४.३-१-१०५-४, तैजूल इस्लाम २०-०-८५-०, जुबैर हुसैन १९-१-११३-२, इम्रूल कायेस १-०-३-०