बांगलादेशविरूद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने यजमानांवर २२४ धावांनी विजय मिळवला. कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर हा अफगाणिस्तानचा दुसरा विजय ठरला. बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा संघ सरस ठरला.

नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ३४२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करता बांगलादेशच्या संघाने पहिल्या डावात केवळ २०५ धावा केल्या. ही आघाडी पुढे नेत अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात २६० धावा केल्या आणि बांगलादेशला विजयासाठी ३९८ धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला केवळ १७३ धावाच करता आल्या.

२२४ धावांच्या लाजिरवाण्या पराभवनंतर बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन हताश झालेला दिसून आला. “मला असं वाटतं की मी संघाचं कर्णधारपद सोडलेलंच बरं. माझ्या क्रिकेट कारकिर्दीच्या दृष्टीने ते आधिक चांगलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. जर कर्णधारपद माझ्याकडेच कायम ठेवायचं असेल तर अनेक प्रश्नांवर संघ व्यवस्थापनाला चर्चा करावी लागेल”असे शाकिब म्हणाला.

“पराभवामुळे मी खूपच हताश झालो आहे. आमच्या हातात चार फलंदाज होते आणि आम्हाला केवळ एक तास ते सव्वा तासाचा वेळ खेळून काढायचा होता. पण दिवसाचा खेळ सुरू होताच पहिल्याच चेंडूवर मी बाद झालो.  मी त्या वेळेला तो फटका मारायला नको होता. त्यामुळे संघ आणखी अडचणीत आला. संघाला पराभवापासून वाचवणे ही माझी जबाबदारी होती, पण मी ती जबाबदारी पार पाडू शकलो नाही. त्यामुळे मी या पराभवाला जबाबदार आहे”, अशी प्रमाणिक कबुलीदेखील त्याने दिली.

३९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या डावात शादमान इस्लाम (४१) आणि शाकिब अल हसन (४४) या दोघांनी काही काळ झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण सामना संपण्यासाठी अवघी २ षटके शिल्लक असताना अफगाणिस्तानने बांगलादेशचा शेवटचा गडी टिपला आणि सामना खिशात घातला.