बांगलादेशचा सर्वात यशस्वी सलामीवीर आणि स्टार क्रिकेटपटू तमीम इक्बाल क्रिकेटच्या एका स्वरुपातून लवकरच निवृत्त होणार आहे. आंतरराष्ट्रीय कारकीर्द वाढवण्याच्या हेतूमुळे तमीम हा निर्णय घेणार आहे. आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याची तमीमची इच्छा आहे.

वैयक्तिक कारणांमुळे तमीम न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत सहभागी झाला नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार, तमीम टी-20 क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. मात्र, तमीमला आगामी वर्ल्डकप स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे. तो म्हणाला, ”अर्थातच टी-20 विश्वचषक माझ्या डोक्यात आहे. या स्पर्धेला फक्त सहा महिने बाकी आहे. मला माझी क्रिकेट कारकीर्द कशी सजवायची हे ठाऊक आहे. क्रिकेटच्या कोणत्या प्रकाराला आधी सोडायचे आणि कोणत्या प्रकाराला नंतर अलविदा करायचे, हे मला माहीत आहे.”

तमीम म्हणाला, ”मला पाच ते सहा वर्षे खेळायचे असेल, तर तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणे खूप अवघड आहे. सर्वसाधारणपणे जर तुम्ही जगभरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंकडे पाहिले, तर तुम्हाला दिसेल की ते एकाच वेळी सर्व स्वरूपातून निवृत्त होत नाहीत. ते एक स्वरूप सोडून नंतर ते इतर दोन स्वरूप खेळतात आणि निवृत्ती घेतात. मलाही तेच करायचे आहे.”

तमीमची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

तमीमने 2008मध्ये बांगलादेशसाठी कसोटी आणि 2007मध्ये एकदिवसीय आणि टी-20 पदार्पण केले. 62 कसोटीत तमीमने 4508, 213 एकदिवसीय सामन्यात 7452 आणि 78 टी-20 सामन्यात 1758 धावा केल्या आहेत. तमीमने कसोटीत 9, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13 तर टी-20 क्रिकेटमध्ये 1 शतक ठोकले आहे.