तब्बल १० वर्षांच्या कालावधीनंतर पाकिस्तानात कसोटी क्रिकेटचं पुनरागमन झालं. श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने १-० ने बाजी मारत, चांगली सुरुवात केली. कसोटी मालिकेचं यशस्वी आयोजन केल्यानंतर पाक क्रिकेट बोर्डाने, यापुढे कसोटी सामन्याचं आयोजन पाकिस्तानबाहेर केलं जाणार नाही हे स्पष्ट केलं.

पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी, भारतात CAB वरुन उसळलेल्या हिंसाचाराचा दाखला देऊन, भारतापेक्षा पाकिस्तानात क्रिकेट अधिक सुरक्षित असल्याचं म्हटलं. मात्र काही तासांमध्येच मणी तोंडावर आपटले आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानात कसोटी मालिका खेळण्यास नकार दिला आहे. बांगलादेशचा संघ पाकिस्तानात फक्त टी-२० मालिका खेळेल असं बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं.

अवश्य वाचा – भारतापेक्षा पाकिस्तानात क्रिकेट अधिक सुरक्षित; पाक क्रिकेट प्रमुखांनी तोडले तारे

“आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. पाकिस्तानात आम्ही फक्त टी-२० मालिका खेळू….मात्र आमच्या बोर्डाशी संलग्न असलेले काही घटक कसोटी मालिका पाकिस्तानात खेळण्यासाठी उत्सुक नाहीत. त्यामुळे कसोटी मालिकाही ही त्रयस्थ ठिकाणी खेळली जाईल”, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष निझामुद्दीन चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. त्यामुळे बीसीसीआयवर टीका करणाऱ्या पाक क्रिकेट बोर्डाची आगामी भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.