मोमिनुल हक (८०), इमरुल कायेस (५१) आणि महमदुल्लाह (४९) यांच्या उल्लेखनीय खेळाच्या जोरावर बांगलादेशने पाकिस्तानी गोलंदाजांचा संयमाने सामना करत मंगळवारपासून सुरू झालेल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ४ बाद २३६ अशी समाधानकारक धावसंख्या उभी केली. २३ वर्षीय मोमिनुलने कसोटीतील १२वे अर्धशतक पूर्ण करून संघाला सावरले.
एकदिवसीय आणि ट्वेंटी -२० मालिकेतील विजयानंतर बांगलादेशने पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर तमीम इक्बाल आणि इमरुल यांनी संघाला अर्धशतकी भागीदारी करून दिली. यासिर शाह याने तमीमला (२५) अझल अलीकरवी झेलबाद करून माघारी धाडले. त्यानंतर इमरूल आणि मोमिनुल जोडीने यजमानांच्या डावाला आकार दिला. इमरुलने १३० चेंडूंत ६ चौकार लगावत ५१ धावांची खेळी करून सलग दहा कसोटींमध्ये अर्धशतक किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम केला.
विवियन रिचर्ड्स (वेस्ट इंडिज), एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), गौतम गंभीर व वीरेंद्र सेहवाग (भारत) या चौघांनी यापूर्वी अशी कामगिरी केली आहे. मोहम्मद हाफिझने इमरुलला बाद केले. त्यानंतर फॉर्मात असलेल्या महमदुल्लाहसह मोमिनुलने संघाला दोनशे धावांच्या नजीक नेले. या जोडीने संयमी खेळ करताना ९५ धावांची भागीदारी केली. अर्धशतकापासून केवळ एक धाव दूर असताना महमदुल्लाहला वाहब रिआजने बाद केले. मात्र, मोमिनुल एका बाजूने संघासाठी खिंड लढवत होता. त्याने १६२ चेंडूंत ८ चौकार मारत ८० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अखेरच्या षटकात मोमिनुल बाद झाला. शाकिब अल हसन १९ धावांवर खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : ४ बाद २३६ (इमरुल कायस ५१, मोमिनुल हक ८०, महमदुल्लाह ४९; वहाब रियाज १/४०)