बांगलादेशचा क्रिकेटपटू तमिम इक्बाल आणि त्याच्या परिवारावर इंग्लंडमध्ये अॅसिड हल्ला झाल्याचं वृत्त बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलं आहे. बांगलादेशातील एका दैनिकाने आपल्या संकेतस्थळावर यासंदर्भातलं वृत्त प्रसारित केलं आहे. २८ वर्षीय तमिम इक्बाल इंग्लंडमधील ‘एसेक्स’ या क्लबशी आपला करार संपवत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ एक आठवड्यापूर्वी तमिमने एसेक्स या क्लबसोबत करार केला होता. इंग्लंडमधील नेटवेस्ट ब्लास्ट सिरीजमध्ये रविवारी एसेक्सचा केंटच्या संघाने ७ गडी राखून पराभव केला. यानंतर लगेचच तमिमने आपला करार रद्द करत माघारी परतण्याचा निर्णय घेतला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार तमिम आपली पत्नी आयेशा आणि एक वर्षाच्या मुलासोबत एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला होता. यावेळी काही जणांनी तमिम आणि त्याच्या परिवाराचा पाठलाग करत त्यांच्यावर अॅसिड फेकल्याचा दावा बांगलादेशी वृत्तपत्रांनी केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तमिम इक्बालने बांगलादेशी वृत्तपत्रांनी दिलेल्या बातमीचं खंडण केलं आहे. पण केवळ एक सामना संपल्यानंतर करार तोडून तमिम इक्बाल माघारी परतल्यामुळे त्याच्यावर दबाव टाकण्यात आल्याची शंकाही व्यक्त केली जातेय. बांगलादेशी वृत्तपत्रांच्या मते तमिम इक्बाल हा वर्णद्वेषाचा बळी ठरला आहे. मात्र तमिम इक्बालने आपल्या फेसबूक पेजवर लिहीलेल्या पोस्टमध्ये असा हल्ला झाल्याची बाब नाकारली आहे.

बांगलादेशी क्रिकेट बोर्डातील काही अधिकाऱ्यांनी तमिम मायदेशात परतल्यानंतर यावर आपली भूमिका जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. तमिमची पत्नी हिजाब घालून समोर दिसल्यामुळे इंग्लंडमध्ये अज्ञात जमावाने तिच्यावर हल्ला केल्याची शक्यताही बांगलादेशी क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर बोलून दाखवली आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.