बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज तमिम इक्बाल वैयक्तिक कारणांमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळणार नाही. तमिमने याबाबतची माहिती संघ व्यवस्थापनाला दिली आहे. “मी याबद्दल टीम मॅनेजमेंट आणि मुख्य प्रशिक्षक यांच्याशी बोललो आहे. टी-२० मालिकेसाठी संघाला मी शुभेच्छा देतो,” असे तमिमने म्हटले.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत तमिमने टी-20 मालिकेत सहभागी न होण्याबद्दल सांगितले आहे. तमिम हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अस्वस्थ असून त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात खेळण्याची अपेक्षा आहे.

तो म्हणाला, “मला आशा आहे की, मी पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळेन. आज मी सराव केला आहे आणि मी उद्या सराव करण्यासाठी जाईन. सध्या मी दुखापतीतून सावरत आहे.”

शाकिब अल हसनही गैरहजर

संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन पितृत्वाच्या रजेमुळे न्यूझीलंड दौर्‍यावर गेला नव्हता. त्यामुळे शाकिबनंतर तमिम न्युझीलंडविरुद्धच्या टी-20 मालकेत न खेळणारा दुसरा खेळाडू आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात 20 मार्चपासून तीन एकदिवसीय सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर 28 मार्चपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल.