यंदा भारतात होणारी आयपीएल स्पर्धा गाजवण्यासाठी बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून (बीसीबी) मान्यता मिळाली आहे. राजस्थान रॉयल्सने आयपीएल लिलावात मुस्तफिजूरला एक कोटींची बोली लावत संघात सामील केले आहे. याआधी तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादकडून खेळला आहे.

क्रिकबझच्या मते, बीसीबीचे मुख्य निवडकर्ता मिंहाजुल अबेदीन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ”मंडळाला असे वाटते की, पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेऐवजी मुस्तफिजुरला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात यावी. श्रीलंका दौऱ्यासाठीच्या आमच्या कसोटी योजनेत मुस्तफिजुरचा समावेश नसल्यामुळे आम्ही त्याला आयपीएलमध्ये खेळण्यास मान्यता दिली आहे. तेथे खेळणे आणि अनुभव घेणे त्याच्यासाठी चांगले असेल.”

आयपीएल 2021च्या लिलावासाठी राजस्थानने सर्वात महागडी बोली लावली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसला 16.25 कोटींची बोली लावत संघात घेतले. शिवाय, संघाचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे मुस्तफिजुरला मॉरिसची योग्य साथ मिळू शकते. मॉरिसपूर्वी, आयपीएलच्या इतिहासात युवराज सिंग सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला 16 कोटींची बोली लागली होती.

राजस्थानने लिलावात खरेदी केलेले खेळाडू

  • ख्रिस मॉरिस – 16.25 कोटी
  • शिवम दुबे – 4.4 कोटी
  • चेतन सकारिया – 1.2 कोटी
  • मुस्तफिजुर रहमान – 1 कोटी
  • लियाम लिव्हिंगस्टोन – 75 लाख
  • आकाश सिंह – 20 लाख
  • केसी करियप्पा – 20 लाख
  • कुलदीप यादव – 20 लाख