News Flash

शाकिब अल हसनला ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

पाहा नक्की काय आहे प्रकरण...

बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकीब अल हसन याने कोलकातामधील काली पूजेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्याबद्दल त्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरूणाला अटक करण्यात आली. IANSच्या वृत्तानुसार, रविवारी दुपारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सिल्हेटचा रहिवासी असलेल्या मोहसीन तालुकदार याने शाकिबला ठार मारण्याची धमकी दिली. काली पूजेला हजेरी लावत शाकिबने मुस्लीम समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत असा आरोप त्याने केला होता. गरज पडल्यास सिल्हेटहून ढाक्यापर्यंत चालत येईन अशी धमकीही त्याने फेसबुक लाइव्हमधून शाकिबला दिली होती.

धमकी देणारा मोहसीन हा २५ वर्षीय तरूण असून तो सिल्हेट विभागातील शहापूरचा रहिवासी आहे. त्याने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शाकिबला धमकी दिली होती. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या तालुकदारने घडलेल्या प्रकारानंतर काही वेळाने पुन्हा फेसबुक लाइव्ह करत धमकी देण्याबद्दल माफी मागितली होती. परंतु त्याचसोबत, क्रिकेटपटू आणि इतर सेलिब्रिटी धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा ‘योग्य मार्गा’चा अवलंब करावा असा पुनरूच्चारही केला होता. त्यानंतर मोहसीन तालुकदारला बांगलादेशच्या रॅपिड अॅक्शन बटालियनने त्याला अटक केली.

दरम्यान, शाकिबने काली पूजेसाठी हजेरी लावून मुस्लीमांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. त्याबद्दल बोलताना शाकिब म्हणाला, “मी पूजेच्या कार्यक्रमासाठी केवळ २ मिनिटं व्यासपीठावर होतो. लोकांचा असा समज झाला की मी त्या पूजेच्या कार्यक्रमाचे उद्धाटन केले. पण मी असं काहीही केलेलं नाही. मी मुस्लीम आहे त्यामुळे अशाप्रकारची कृती नक्कीच करणार नाही. मी तिथे जायलाच नको होतं. झालेल्या गैरसमजाबद्दल मला माफ करा. मी नेहमी इस्लाम धर्माचं पालन केलं आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो”, असं शाकिबने ऑनलाइन फोरमशी बोलताना स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 5:18 pm

Web Title: bangladesh police arrest 25 yrs old man for issuing death threat to shakib al hasan on facebook live vjb 91
Next Stories
1 IND vs AUS VIDEO: नेट्समध्ये केएल राहुलची धडाकेबाज फलंदाजी
2 जाणून घ्या टीम इंडियाचं २०२१ चं वेळापत्रक…
3 जीवे मारण्याची धमकी मिळालेल्या क्रिकेटपटूने स्वत:च मागितली माफी, कारण…
Just Now!
X