एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने यजमान बांगलादेशवर २२४ धावांनी विजय मिळवला. कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर हा अफगाणिस्तानचा दुसरा विजय ठरला. बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात हा पहिलाच कसोटी सामना होता. त्यात अफगाणिस्तानचा संघ सरस ठरला. याचसोबत बांगलादेशने एक अत्यंत लाजिरवाणा आणि कोणालाही न जमलेला विक्रम आपल्या नावे केला.

आतापर्यंत प्रत्येक नव्या प्रतिस्पर्ध्याविरोधात खेळताना बांगलादेशला पहिल्या कसोटीत पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. बांगलादेशने आतापर्यंत भारत, झिम्बाब्वे, पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या संघांशी कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी प्रत्येक संघाशी पहिला कसोटी सामना खेळताना बांगलादेशला पराभूत व्हावे लागले आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला विजय मिळेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती, पण चाहत्यांची ती आशा फोल ठरली. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ३४२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करता बांगलादेशच्या संघाने पहिल्या डावात केवळ २०५ धावा केल्या. ही आघाडी पुढे नेत अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात २६० धावा केल्या आणि बांगलादेशला विजयासाठी ३९८ धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला केवळ १७३ धावाच करता आल्या.