दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत अकबर अलीच्या नेतृत्वाखाली बांगलादेशी संघाने इतिहास घडवला. अंतिम फेरीत प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली भारतीय संघावर मात करत बांगलादेशने पहिल्यांदा १९ वर्षाखालील विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. मात्र १८ वर्षीय बांगलादेशी कर्णधारासाठी हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. आपल्या लाडक्या बहिणीच्या निधनाचं दु:ख विसरुन अकबर अलीने वाघासारखा खेळ करत संघाला विजय मिळवून दिला.

अवश्य वाचा – U-19 World Cup Final : विजयाचा उन्माद बांगलादेशला भोवणार, ICC कारवाईच्या तयारीत

बांगलादेशमधील आघाडीचं वृत्तपत्र ‘प्रोथोम आलो’ ने दिलेल्या बातमीनुसार, अकबर अलीची बहिण खादीजा खातूनचा २२ जानेवारी रोजी प्रसुतीवेळी निधन झालं. मात्र अकबरवर या गोष्टीचा परिणाम होऊ नये यासाठी त्याच्या घरच्यांनी ही गोष्ट त्याला कळू दिली नाही. मात्र काही दिवसांनी अकबरला ही बातमी समजली, तो त्याच्या बहिणीचा एकदम लाडका होता. अकबरच्या वडिलांनी वृत्तपत्राला माहिती दिली.

“आम्ही सुरुवातीला या गोष्टीबद्दल सांगायचं नाही असं ठरवलं होतं. मात्र त्याला ही गोष्ट समजली आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर त्याने मला फोन केला आणि मला ही गोष्ट का सांगितली नाही असं विचारलं. पण ही गोष्ट त्याला सांगावी एवढ बळ माझ्या अंगात त्यावेळी नव्हतं, त्याला काय सांगू हेच समजत नव्हतं”, त्या प्रसंगाची आठवण काढताना अकबरचे वडिल हळवे झाले होते.

अवश्य वाचा – U-19 World Cup : बांगलादेशी खेळाडूंचं सेलिब्रेशन किळसवाणं होतं, भारतीय कर्णधाराची प्रतिक्रिया

अंतिम सामन्यात रवी बिश्नोईने ४ बळी घेत बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडलं होतं. मात्र अकबर अलीने संयमी खेळ करत भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. विजयानंतर भारत आणि बांगलादेशी खेळाडूंमध्ये झालेल्या झटापटीमुळे या विजयाला गोलबोट लागलं, मात्र अकबर अलीने त्या प्रसंगातही संघाची बाजू सांभाळत घेत घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. आज जगभरात अकबर अली आणि बांगलादेशच्या संघाचं कौतुक होत आहे, मात्र हे कौतुक पाहण्यासाठी अकबरची बहिण आज सोबत नाही ही सल त्याच्या मनात कायम राहील.

अवश्य वाचा – Video : संघाच्या विजयाला बांगलादेशी खेळाडूंनी लावलं गालबोट, भर मैदानात हमरीतुमरी