न्यूझीलंडमध्ये साऊथ आयलँडवरील ख्राइस्टचर्च शहरात आज सकाळी दोन मशीदींमध्ये अज्ञात इसमाने गोळीबार केला आहे. या हल्ल्यात अंदाजे नऊ जण ठार झाले असून घटनास्थळी असलेल्या बांगलादेश क्रिकेट संघाच्या खेळाडूंना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. या दरम्यान, बांगलादेश क्रिकेट संघाने उर्वरित दौरा रद्द केला असून संघ लवकरच मायदेशी परतणार आहे. १० फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बांगलादेशचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर होता. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिका पूर्ण झाली होती. तर ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील २ सामने पूर्ण झाले होते. उर्वरित एक कसोटी सामना १६ ते २० मार्च दरम्यान ख्राइस्टचर्च येथे होणार होता. मात्र या घटनेनंतर हा दौरा रद्द करण्यात आला असून बांगलादेशचा संघ लवकरच मायदेशी रवाना होणार आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते जलाल युनिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडू बसमध्ये होते आणि मशिदीत जाण्याची तयारी करत असतानाच गोळीबार झाला. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचं सागंण्यात येत आहे. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला.

‘सर्व खेळाडू सुरक्षित आहेत. मात्र सर्वांना मानसिक धक्का बसला आहे. आम्ही सर्व खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्यास सांगितलं आहे’, अशी माहिती जलाल यांनी दिली आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा फंलदाज तमिम इकबाल याने ट्विट केलं आहे की, ‘गोळीबारातून संपूर्ण संघ बचावला आहे. अत्यंत भीतीदायक अनुभव होता. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा’.