बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्ला याने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातील पराभवासाठी फलंदाज दोषी असल्याचे म्हटले आहे. चांगल्या सुरुवातीनंतरही फलंदाजांच्या हाराकिरीमुळे बांगलादेशला पराभव पत्करावा लागला, असे महमदुल्लाने सांगितले.

‘‘आम्हाला आमच्या फलंदाजीत बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. पण फलंदाजीतील काही कमकुवत बाजूंवर अद्यापही मेहनत घ्यावी लागेल. १२व्या षटकांत १०२ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर आम्ही १८०पेक्षा अधिक धावा उभारण्याची गरज होती. फलंदाजीसाठी खेळपट्टी पोषक असल्यामुळे अधिकाधिक धावा करण्याची संधी आम्ही गमावली. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये जर ४० चेंडू निर्धाव घातले तर सामना जिंकण्याची संधी कमी होते. आम्ही ३८ चेंडू निर्धाव घातले,’’ असे महमदुल्लाने सांगितले.

रोहितच्या कामगिरीविषयी महमदुल्ला म्हणाला, ‘‘रोहित शर्मा बहरात आला की त्याला रोखणे कठीण असते. चौफेर फटकेबाजी करणाऱ्या रोहितला गोलंदाजी कुठे करायची, हा सर्वच संघांना प्रश्न असतो.’’