तमीम इक्बालची शतकी खेळी; ओमानवर मात
अनुभवी सलामीवीर फलंदाज तमीम इक्बालच्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने ओमानवर विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला. डकवर्थ लुईस पद्धतीद्वारे झालेल्या लढतीत बांगलादेशने ५४ धावांनी विजय मिळवला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना १८२ धावा केल्या. ओमान संघाने ६५ धावांची मजल मारली.
तमीम आणि सौम्या सरकार जोडीने ४२ धावांची सलामी दिली. यानंतर तमीमने सब्बीर रहमानच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागादारी केली. सब्बीर २६ चेंडूत ४४ धावा करून तंबूत परतला. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर चौकार, षटकारांची लयलूट केली. बिलाल खानच्या गोलंदाजीवर चौकार खेचत तमीमने शतक पूर्ण केले. तमीमने १० चौकार आणि ५ षटकारांसह ६३ चेंडूत १०३ धावांची खेळी साकारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना, पावसाने तीनदा व्यत्यय आणला आणि ओमानचे लक्ष्य बदलण्यात आले. सातत्याने विकेट गमावणाऱ्या ओमानने १२ षटकांत ९ विकेट्सच्या मोबदल्यात ६५ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : २० षटकांत २ बाद १८२ (तमीम इक्बाल १०३, सब्बीर रहमान ४४, खावर अली १/२४) विजयी विरूद्ध ओमान : १२ षटकांत ९ बाद ६५ (जतिंदर सिंग २५, शकीब अल हसन ४/१५)
सामनावीर : तमीम इक्बाल