पदार्पणातील चौथ्या डावात द्विशतक साकारणारा कायले मेयर्स हा पहिला फलंदाज ठरला आहे. मेयर्सच्या नाबाद द्विशतकामुळे वेस्ट इंडिजने बांगलादेशचे ३९५ धावांचे लक्ष्य पार करून पहिल्या कसोटी सामन्यात तीन गडी राखून विजय मिळवला.

मेयर्सने ३१० चेंडूंत २० चौकार आणि सात षटकारांसह नाबाद २१० धावा केल्या. त्यामुळे विंडीजने पाचव्या क्रमांकाचे धावलक्ष्य पेलले. पहिल्या डावातही ४० धावा करणाऱ्या मेयर्सने दुसऱ्या डावात निक्रूमा बोनरच्या (८) साथीने चौथ्या गड्यासाठी २१६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मेयर्र्सने गलीच्या दिशेने चौकार खेचत १७७ चेंडूंत शतक पूर्ण केले. पदार्पणात चौथ्या डावात शतक झळकावणारा तो आठवा फलंदाज ठरला. त्यानंतर त्याने अधिक आक्रमक पवित्रा घेत जोशुआ डासिल्व्हाच्या साथीने सहाव्या गड्यासाठी १०० धावांची भागीदारी केली. यात डासिल्व्हाचे योगदान फक्त २० धावांचे होते. बांगलादेशकडून मेहिदी हसन मिराझने चार बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

  • बांगलादेश (पहिला डाव) : ४३०
  •  वेस्ट इंडिज (पहिला डाव) : २५९
  •  बांगलादेश (दुसरा डाव) : ८ बाद २२३ डाव घोषित
  •  वेस्ट इंडिज (दुसरा डाव) : १२७.३ षटकांत ७ बाद ३९५ (कायले मेयर्स नाबाद २१०, निक्रूमा बोनर८६; मेहिदी हसन मिराझ ४/११३)
  • सामनावीर : कायले मेयर्स