महिला टी२० आशिया चषक स्पर्धेत आज भारतीय संघाला दोन विजयानंतर पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. बांगलादेशच्या संघाने भारतावर २ चेंडू आणि ७ गडी राखून विजय मिळवला. रुमाना अहमदची अष्टपैलू कामगिरी आणि फरगना हकचे नाबाद अर्धशतक याच्या बळावर बांगलादेशने भारताच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लावला.

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधार मिताली राज (१५), सलामीवीर स्मृती मानधना (२) आणि पूजा वस्त्राकार (२०) या तिघी झटपट बाद झाल्या. मात्र हरमनप्रीत कौरने ४२ धावा केल्या. तिला दीप्ती शर्माने चांगली साथ दिली. दिप्तीने २८ चेंडूत ५ चौकारांसह ३२ धावा केल्या. तर हरमनप्रीतने ३७ चेंडूत ६ चौकारांसह ४२ धावा केल्या. या दोघींच्या खेळीमुळे भारताला २० षटकात ७ बाद १४१ धावा केल्या.

१४२ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाची सुरुवात थोडीशी डळमळीत झाली. आयेशा रहमान ही १२ धावांवर बाद झाली. मात्र त्यानंतर आलेल्या फरगना हकने अप्रतिम फलंदाजी केली. तिने नाबाद ५२ धावा केल्या. या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. दरम्यान, सलामीवीर शमिमा सुलताना ३३ धावांवर बाद झाल्यानंतर लगेचच निगार सुलतानाही १ धाव काढून बाद झाली. अखेर फरगनाने रुमाना अहमदच्या साथीने किल्ला लढवला. आणि शेवटच्या षटकात २ चेंडू राखून सामना जिंकवला.

२१ धावांत ३ गडी टिपणाऱ्या आणि नाबाद ४२ धावा करणाऱ्या रूमाना अहमदला सामनावीर घोषित करण्यात आले.