भारतीय क्रिकेट संघाविरोधात कायमच वक्तव्य करणारा बांगलादेशचा यष्टीरक्षक मुश्फिकूर रहिम पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळेस मुश्फिकूरने भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीबद्दल एक वक्तव्य केलं आहे. धोनी हा माझा आदर्श आहे असं मुश्फिकूरने म्हटलं आहे. याआधी मुश्फिकूरने कधीच कोणत्या खेळाडूबद्दल असं वक्तव्य केलेलं नाही. मात्र धोनीची खेळासंदर्भातील हुशारी, कर्णधार म्हणून नेतृत्व आणि परिस्थिती ओळखून खेळ सावरण्याची कला पाहून मुश्फिकूर त्याचा चाहता झाला आहे.

बांगलादेशचा स्टार खेळाडू असणाऱ्या मुश्फिकूरने “धोनीचा सिक्थ सेन्स खूप चांगला आहे. तसेच क्रिकेटबद्दलच त्याचं ज्ञान अफाट आहे. यामुळेच तो इतर कोणत्याही कर्णधारापेक्षा जास्त वेगळा वाटतो. मी धोनीचा चाहता आहे. माझ्यामध्ये धोनी ऑल टाइम ग्रेट कर्णधारांपैकी एक आहे,” असं म्हटलं आहे. बिझनेस स्टँण्डर्ससोबत बोलताना मुश्फिकूरने धोनीबद्दल मत व्यक्त केलं. “धोनी कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये पुढे काय होईल याचा योग्य अंदाज लावू शकतो. त्यामुळेच त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना संघाची जिंकण्याची टक्केवारी अधिक आहे. आयसीसीचा असा कोणताही पुरस्कार आणि स्पर्धा नाही जी धोनीने जिंकली नाही. धोनी मला एक कर्णधार म्हणून खूप आवडतो. आधी मी सांगितलं होतं की कोणताही खेळाडू मला आदर्श वाटत नाहीत. मात्र आता मी सांगेन की धोनी माझ्यासाठी आदर्श खेळाडू आहे,” असं मुश्फिकूर म्हणाला.

मुश्फिकूर नेहमीच सोशल मिडियावर ट्रोल होत आला आहे. त्याने अनेकदा भारताविरोधात ट्विट केले आहेत. त्यामुळेच भारतीय चाहते त्याच्यावर कायम नाराज असतात. सन २०१६ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये वेस्ट इंडिजने भारताला हरवलं होतं त्यावेळी मुश्फिकूरने आनंदाने एक ट्विट केलं होतं. त्यानंतर तो बराच ट्रोल झाला होता.