आयसीसीकडून दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या शाकीब अल हसनवर, बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. शाकीब चुकीचं वागला असून यामुळे क्रिकेटसह बांगलादेशचं नावही खराब झाल्याचं शेख हसीना यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलत असताना सांगितलं.

“शाकीब चुकीचं वागला आहे आणि त्याने ते मान्यही केलंय. त्याला शिक्षा भोगावीच लागेल. सरकार म्हणून आम्ही या प्रकरणी लक्ष घालू शकत नाही, मात्र बांगलादेश क्रिकेट बोर्ड नेहमी त्याच्या पाठीशी उभं राहिलं. भ्रष्टाचार आणि फिक्सींग सारख्या गोष्टींना सरकार कधीही पाठींबा देणार नाही.” हसीना यांनी आपली प्रतिक्रीया दिली.

अवश्य वाचा – शाकीब आणि भारतीय बुकी ! आयपीएलवर पुन्हा फिक्सींगचे काळे ढग

शाकीब अल हसनला काही बुकींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शाकीबने ही बाब आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे कळवली नाही. त्यामुळे आयसीसी नियमांचा भंग केल्या प्रकरणी शाकीबवर बंदी घालण्यात आली आहे.